संदीप मापारी पाटील, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यात ३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेल्या जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील गावांना केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शनिवारी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करत त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले.
गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. यापूर्वीच प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
जिल्ह्यात दाखल होताच त्यांनी चावरा, इलोरा, मडाखेड खुर्द, मडाखेड बुद्रुक, काजेगाव, बोराळा बुद्रुक, बोराळा खुर्द, खेर्डा खुर्द, खेर्डा बुद्रुक, चांगेफळ, रुधाणा आणि वकाणा या गावांना भेट देत शेतपिके, शेती आणि घरांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी शासन बाधितांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तसेच घरांच्या पडझडीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना शासनाची मदत वेळेत मिळेल, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी दौऱ्यात तहसीलदार पवन पाटील, अजाबराव वाघ, कृषी अधिकारी रमेश वाघ, गटशिक्षणाधिकारी ऐश्वर्या कोरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

