Dailyhunt
बारामतीत तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; मोबाईलसह १५ हजारांची लूट, एकास अटक

बारामतीत तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; मोबाईलसह १५ हजारांची लूट, एकास अटक

जीवे मारण्याच्या धमक्या देत रस्त्यावर सोडले; मुख्य आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

बारामती :महान्यूज लाईव्ह

बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील २३ वर्षीय प्रतिक धंगेकर या तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंटू उर्फ शरद धुमाळ (रा. कोराळ, ता. बारामती) याला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रतिक धंगेकर हा पुण्यात नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. २४ एप्रिल रोजी दुपारी तो बारामतीतील रिलायन्स मॉल परिसरात असताना आरोपी कारमधून येऊन त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेले. आरोपी धुमाळ याच्या पत्नीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून त्याच्याकडील दोन मोबाईल काढून घेत त्याला मारहाण करण्यात आली.

त्यानंतर तांदुळवाडी रोडवरील एका हॉटेलच्या गोडाऊनजवळ नेऊन लाकडी दांडक्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. "पिंटू धुमाळ यांच्या पाया पडून माफी माग" असा दबाव टाकत व्हिडिओ शूट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यावेळी आरोपींनी त्याच्या खिशातील १५,३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. मारहाणीत त्याचे घड्याळ तुटून पडले असून तेही आरोपींनी उचलून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गंभीर मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्याला रस्त्यावर सोडून दिले तसेच पोलीसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिंटू उर्फ शरद धुमाळ, भारत मोहीते, अक्षय सोनवणे, अधिराज मोरे व इतर अनोळखी व्यक्तींविरोधात अपहरण, मारहाण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी पिंटू उर्फ शरद धुमाळ यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम व पोलीस जवान दादा दराडे करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live