पुणे : महान्यूज लाईव्ह
बारावीची परीक्षा दिलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची उत्सुकता अखेर संपणार असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांच्याकडून बारावी (HSC) परीक्षेचा निकाल उद्या शनिवार दिनांक २ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकवर्गातही या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
यंदा राज्यभरातून विज्ञान, वाणिज्य आणि कला या शाखांमधील लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षा कालावधीत कोणत्याही मोठ्या गैरप्रकाराशिवाय प्रक्रिया पार पडली असून आता निकालाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ जाहीर होणार आहे.
निकाल जाहीर होताच विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळांवर आपला सीट नंबर व आईचे नाव टाकून निकाल पाहू शकणार आहेत. ग्रामीण भागातील तसेच इंटरनेटची सुविधा मर्यादित असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत ज्यामुळे सर्वांना निकाल सहज पाहता येईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालासोबतच एकूण उत्तीर्ण टक्केवारी, विभागनिहाय निकाल, मुला-मुलींचे प्रमाण आणि गुणवत्ता यादी यांची माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत मुलींचा निकालात वरचष्मा राहिल्याचे चित्र दिसून आले होते यंदा देखील त्याची पुनरावृत्ती होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी पुढील टप्पा म्हणजे उच्च शिक्षणाच्या प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, कला आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज प्रक्रिया वेग घेणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती आधीच तयार ठेवण्याचे आवाहन शिक्षणतज्ज्ञांनी केले आहे.
निकालाबाबत कोणतीही अफवा किंवा चुकीची माहिती टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांवरच विश्वास ठेवावा असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. २ मे दुपारी १ वाजता लागणारा हा निकाल हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, त्यांच्या पुढील करिअरचा मार्ग निश्चित करणारा ठरणार आहे.

