बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसला स्पष्ट इशारा दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
बिनविरोध निवडणुकीची शक्यता असताना काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे यावर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बारामतीच्या भावनांशी खेळ नको; युवा नेते पार्थपवार
राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केले की, बारामती ही केवळ राजकीय भूमी नाही तर ती भावना, विश्वास आणि अनेक वर्षांच्या विकासाची साक्षीदार आहे. दिवंगत अजित पवार यांच्या कार्यामुळे जनतेमध्ये प्रचंड भावनिक नातं निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही अपेक्षा व्यक्त होत असताना काँग्रेसने वेगळी भूमिका घेणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. जर काँग्रेसने उमेदवार दिला तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा त्यांनी दिला.
युवा नेतृत्वाची ठाम भूमिका
या निवडणुकीत युवा नेते पार्थ पवार यांची भूमिका केवळ पक्षाच्या नेत्यापुरती मर्यादित नसून ते बारामतीच्या जनतेच्या भावना मांडणारा आवाज म्हणून पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष अधिक आक्रमकपणे निवडणुकीस सामोरे जाण्याच्या तयारीत आहे.
काँग्रेसची भूमिका
काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी देऊन महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत. बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव जवळपास मागे पडला असून आता बारामतीत थेट लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते युवा नेते पार्थ पवार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची बनली आहे.
उमेदवारी अर्जावेळी राजकीय एकजुटीचे दर्शन
पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना राजकीय एकजुटीचे दर्शन बघायला मिळाले. या वेळी राज्यातील अनेक प्रमुख नेते एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मंत्री व आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य उपस्थितीमुळे बारामतीत पवार कुटुंबाभोवती एकजूट असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

