मुंबई, दि. ३१ : दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार आणि उपरोधिक शब्दांत टीका केली आहे.
“दगडावरील फिंगरप्रिंटही पोलिसांनी घेतले आहेत. त्यानुसार तपास होईल,” या चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली.
रोहित पवार यांनी म्हटले की, “चंद्रकांत दादांचे हे वक्तव्य फॉरेन्सिक तपासाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणारे आहे. त्यांनी ही अद्भुत टेक्नॉलॉजी महाराष्ट्र पोलिसांनाही शिकवावी, म्हणजे बोगस पदवी प्रकरण, MH-CET, MPSC फूड अँड ड्रग्स इन्स्पेक्टर भरती, NEET तसेच तलाठी पेपरफुटी यांसारख्या गाजलेल्या प्रकरणांचा तपास अधिक प्रभावीपणे करता येईल.”
यापुढे त्यांनी आणखी उपरोधिक टोला लगावत राज्याचे गृहमंत्री यांनी फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसाठी चंद्रकांत पाटील यांचे ‘गेस्ट लेक्चर’ आयोजित करावे, अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर “निखळ मनोरंजन” हे स्वतंत्र खाते निर्माण करून त्याचा अतिरिक्त कार्यभारही चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवावा, असा चिमटाही त्यांनी काढला.
रोहित पवार यांनी या कथित तंत्रज्ञानासाठी ‘स्वामित्व हक्क (पेटंट)’ घेण्याचाही सल्ला दिला. भारतावर दबाव टाकून विविध करार करणाऱ्या अमेरिकेलाही हे तंत्रज्ञान उपयोगी पडू शकते, अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. दरम्यान, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे.

