Thursday, 22 Jul, 5.27 pm महान्यूज LIVE

होम
धक्कादायक : पुणे जिल्ह्यातील नावलौकिक असणाऱ्या वाबळेवाडी शाळेतील शिक्षकांचे तडकाफडकी राजीनामे! जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये खळबळ!

शिरूर : महान्यूज लाईव्ह

शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी या राज्यात प्रसिद्ध व नावलौकिक असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांसह 3 शिक्षकांनी केवळ बदली नाही, तर नोकरीचा राजीनामा देऊन टाकला. या घटनेने जिल्ह्यात शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण शिक्षकांच्या लक्षात आले नसल्याने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली.

फक्त ३२ विद्यार्थीसंख्येवर सुरू झालेल्या शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेने ग्रामस्थांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांचा पट नऊ वर्षांत ५१४ पर्यंत नेला. देश विदेशातील नामांकित शाळांसोबत सामंजस्य करार करून अभिनव शिक्षणपद्धती विकसित केलेल्या या शाळेचे मुख्याध्यापक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रेय वारे यांनी मुख्याध्यापक पद आणि शासकीय सेवेचा आज (ता. २२ जुलै) तडकाफडकी राजीनामा दिला.

त्यांच्यासमवेत त्यांचे सहकारी शिक्षक एकनाथ खैरे, केंदूर (ता. शिरूर) येथील मुख्याध्यापक जयसिंग नन्हे यांनीही राजीनामा दिला आहे. बाहेरील व्यक्तींकडून कामकाजात होत असलेल्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ त्यांनी हा निर्णय घेतला.
नावीन्यपूर्ण उपक्रमांनी देशभर नावाजलेले व देश-विदेशातील शाळांशी सामंजस्य करार करून अभिनव शिक्षण पद्धती लागू केलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते जिल्हा परिषद शिक्षक दत्तात्रेय वारे यांना कोंडीत पकडून शाळा बदनाम करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू होता.

याबाबत ग्रामस्थांनीही प्रशासनाकडे तशा तक्रारी केल्या होत्या. शाळेत ग्रामस्थांकडून सुरू केलेल्या इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये वारे व इतर शिक्षकांना ओढून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याने वारे यांनी व्यथित होवून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. आर्थिक व्यवहारात वारे यांचा सहभाग नसताना त्यांना त्यात जाणीवपूर्वक अडकविण्याचा प्रयत्न झाला.

ज्या हेतूने आपण ही शाळा मोठी केली त्या वर न बोलता दुसऱ्याच गोष्टीवर शाळेला आणि शिक्षकांना बदनाम करण्याचा प्रकार चालू झाल्याने शिक्षकांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल ठरला. यामुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अपरिमित नुकसान होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live
Top