Friday, 24 Sep, 3.03 pm महान्यूज LIVE

होम
दुधामध्ये मिनरल ऑईल व दुध पावडरची भेसळ..! इंदापूर तालुक्यातील लाकडी येथील दूध संकलकाविरोधात अन्न व औषध प्रशासनाचा गुन्हा!

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्र पाठोपाठ इंदापूर तालुक्यातील लाकडी येथील राजाराम मधुकर खाडे याच्या विरोधात दुधामध्ये भेसळ केल्यावरून अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना 29 जुलै 2019 रोजी घडली होती. अन्न व औषध प्रशासन खात्याने खाडे यांच्या राहत्या घरी गोपनीय माहिती मिळाली, म्हणून धाड टाकली होती. तेव्हा त्या ठिकाणी गाईच्या दुधामध्ये दूध पावडर व लिक्विड पॅराफीन मिसळून दुधामध्ये भेसळ केली जात असल्याचे दिसून आले होते. त्यावरून 118 लिटर गाईचे दूध नष्ट करण्यात आले व वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

या दूधाचा नमुना प्रयोगशाळेकडे पाठवला होता. तो अहवाल 21 सप्टेंबर 2021 रोजी आला. त्यामध्ये स्किम्ड मिल्क पावडर आणि नॉन फूड ग्रेड पॅराफीन यांची भेसळ केली असल्याचे सिद्ध झाले. त्यावरून अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी सुलेन्‍द्र शिरसागर यांनी दोन दिवसांपूर्वी राजाराम मधुकर खाडे याच्यासह भेसळ कारक पदार्थ पुरवणाऱ्या पुरवठादाराविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अर्जुन भुजबळ, संजय नारगुडे, बालाजी शिंदे क्रांती बारवकर राहुल खंडागळे यांच्या पथकाने केली पुढील तपास पोलिस ठाण्याचे फौजदार नितीन लकडे करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live
Top