Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गणेशोत्सवाच्या तोंडावर वाई MIDC तील मूर्ती कारखान्याला भीषण आग! वैभव आर्ट हस्तकला महिला उद्योगातील कोट्यवधींचे साहित्य जळून खाक!

गणेशोत्सवाच्या तोंडावर वाई MIDC तील मूर्ती कारखान्याला भीषण आग! वैभव आर्ट हस्तकला महिला उद्योगातील कोट्यवधींचे साहित्य जळून खाक!

दौलतराव पिसाळ, वाई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच वाई MIDC परिसरातील गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. प्लॉट क्रमांक १८ येथील 'वैभव आर्ट हस्तकला महिला उद्योग' या कारखान्याला रात्री सुमारे दहाच्या सुमारास आग लागली.

आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने तयार गणेशमूर्ती, गौरीच्या मूर्ती, कच्चे साहित्य आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार करून त्यांना रंगकाम व अंतिम स्वरूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यामुळे कारखान्यात मोठ्या प्रमाणात तयार मूर्ती आणि साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. आगीच्या भक्ष्यस्थानी हे सर्व साहित्य पडल्याने बावळेकर कुटुंबीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची तीव्रता लक्षात घेऊन वाई, पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज आणि सातारा येथून पाच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री दहाच्या सुमारास सुरू केलेले शर्थीचे प्रयत्न पहाटेपर्यंत सुरू होते. तब्बल पाच ते सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

दरम्यान, आगीचे लोळ आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. आग विझविताना अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. कारखान्यात मोठ्या प्रमाणावर मूर्ती व ज्वलनशील साहित्य असल्याने आग वारंवार भडकत होती.

घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस प्रशासन, महावितरणचे कर्मचारी यांच्यासह पंचायत समिती सभापती पै. विक्रांत डोंगरे, नगरसेवक विजय ढेकाणे, सुशील खरात, विजय पाटणे, चरण गायकवाड, प्रशांत डोंगरे यांच्यासह बोपर्डी येथील युवक आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले.

'वैभव आर्ट हस्तकला महिला उद्योग' हे गणेशमूर्ती निर्मिती क्षेत्रातील महत्त्वाचे नाव असून, येथे तयार होणाऱ्या गणेशमूर्ती देशाच्या विविध भागांसह परदेशातही पाठविल्या जात असल्याचे सांगण्यात येते. गणेशोत्सवाच्या ऐन तयारीच्या काळातच कारखान्याला आग लागल्याने मूर्ती निर्माते, खरेदीदार आणि गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू आहे. पंचनामा आणि पुढील तपासानंतर नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live