Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ग्वाल्हेरमध्ये पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या लड्डू गोपालच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त

ग्वाल्हेरमध्ये पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या लड्डू गोपालच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त

ग्वाल्हेरमध्ये पाच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या लड्डू गोपाल (भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपातील) मूर्तीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) कार्यरत झाले आहे. एका महिलेची या मूर्तीशी असलेली अतूट भावनिक नाळ आणि भक्ती पाहून स्थानिक पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

ग्वाल्हेरमधील ही अनोखी घटना असून या प्रकरणातील प्रमुख व्यक्ती विजया शर्मा या अलकापुरी येथील रहिवासी आहेत. बालपणापासून त्यांच्याकडे असलेल्या लड्डू गोपालच्या मूर्तीला त्या आपल्या लहान भावाप्रमाणे जपतात.

२९ जानेवारी रोजी विजया शर्मा आणि त्यांची बहीण महाराज बाडा येथील भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी गेल्या असताना ही मूर्ती चुकून हरवली. त्यानंतर त्यांनी अनेक महिने दररोज बाजार परिसरात मूर्तीचा शोध घेतला. मूर्ती परत मिळवून देणाऱ्यास रोख बक्षीसही जाहीर केले. मात्र, मूर्ती न्यायालयीन पुरावा बनू नये, या भावनेतून त्यांनी सुरुवातीला अधिकृत पोलिस तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली.

SIT का स्थापन करण्यात आली?

अनेक महिने प्रयत्न करूनही मूर्तीचा शोध न लागल्याने विजया शर्मा आणि त्यांच्या बहिणीने थेट ग्वाल्हेरचे पोलीस महानिरीक्षक (IG) अरविंद सक्सेना यांची भेट घेतली. त्यांच्या भावनिक नात्याची दखल घेत आयजींनी या प्रकरणाचा औपचारिक तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सीएसपी किरण अहिरवार यांच्या नेतृत्वाखाली माधवगंज, कोतवाली आणि जनकगंज या तीन पोलीस ठाण्यांतील सहा पोलिसांचा समावेश असलेले विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, बेपत्ता लड्डू गोपालच्या मूर्तीचा शोध सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live