महसूल प्रशासनावर भ्रष्टाचार, दिरंगाई आणि मनमानीचे आरोप; माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
इंदापूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करण्यात आले.
पुणे जिल्हा भाजपाचे महामंत्री डॉ. आकाश कांबळे यांनी महसूल प्रशासनावर शेतकऱ्यांची पिळवणूक, कामकाजातील दिरंगाई, अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी जाहीर केली.
डॉ. कांबळे यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात’ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाणीवपूर्वक लावण्यात आला नव्हता. तसेच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचाही उल्लेख टाळल्याचा आरोप त्यांनी केला.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित रस्त्यांच्या प्रकरणांबाबत बोलताना, महाराष्ट्रात सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे इंदापूरमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या अर्जांवर वेळेत निर्णय होत नसल्याने त्यांना वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, “टेबलावर वजन ठेवल्याशिवाय कामे होत नाहीत,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
उजनी धरण परिसरातील वाळू उपसा, जमिनींचे वाद, रस्त्यांची प्रकरणे आणि महसूल विभागातील विविध कामांमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप करत, यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या सर्व प्रकरणांबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत (RTI) माहिती मागविण्यात आली असून, नियमानुसार माहिती न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. कांबळे यांनी दिला.
तसेच, मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे इंदापूरच्या तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगत, शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने न सोडवल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, या आरोपांवर तहसीलदार अथवा महसूल प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.

