Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जन्माआधीच कोवळ्या कळ्यांचा बळी देण्याचा कारनामा..! राहता येथे गर्भलिंग तपासणी रॅकेट उघड, डॉक्टर- एजंट रंगेहाथ जाळ्यात!

जन्माआधीच कोवळ्या कळ्यांचा बळी देण्याचा कारनामा..! राहता येथे गर्भलिंग तपासणी रॅकेट उघड, डॉक्टर- एजंट रंगेहाथ जाळ्यात!

अहिल्यानगर : महान्यूज लाईव्ह

हिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात सुरू असलेल्या गर्भलिंग तपासणीच्या घृणास्पद रॅकेटवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. समाजमन हादरवणाऱ्या या प्रकारात एका डॉक्टरसह एजंटला रंगेहात पकडण्यात आले असून मुलींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणाऱ्या या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला आहे.

या कारवाईची सुरुवात एका खात्रीलायक गुप्त माहितीतून झाली. ही माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. त्यांच्या निर्देशानुसार श्रीरामपूर विभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. अत्यंत गोपनीयतेने आणि अचूक नियोजनाने या पथकाने सापळा रचला.

पोलिसांनी डिकॉय ऑपरेशनचा वापर करत बनावट गर्भवती महिलेला ग्राहक म्हणून आरोपींपर्यंत पोहोचवले. व्यवहार सुरू होताच ठरलेल्या क्षणी पोलिसांनी पिंपरी निर्मळ परिसरातील लोणी-पिंपरी निर्मळ रस्त्यालगत निळवंडे कालव्याजवळील शेतीत असलेल्या दोन खोल्यांच्या ओसाड घरावर छापा टाकला. छाप्यात उघड झालेलं चित्र संतापजनक होतं.

एका बाजूला डॉक्टर आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर करत गर्भातील लिंग निश्चित करण्याचे काम करत होता तर दुसरीकडे एजंट हा संपूर्ण व्यवहाराचा सूत्रधार बनून ग्रामीण भागातील कुटुंबांना या बेकायदेशीर जाळ्यात ओढत होता. मुलगा हवा या मानसिकतेचा फायदा घेत तो कुटुंबांकडून मोठी रक्कम उकळत होता आणि त्यांना डॉक्टरकडे आणत होता.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी डॉक्टर आणि एजंटला ताब्यात घेतले असून घटनास्थळी गर्भलिंग तपासणीसाठी आलेल्या महिलांनाही सुरक्षिततेच्या दृष्टीने ताब्यात घेण्यात आले. ठिकाणावरून जप्त करण्यात आलेल्या साहित्याने या रॅकेटची गंभीरता अधोरेखित केली आहे. सोनोग्राफी मशीन, मॉनिटर, बॅटरी प्रणाली, अल्ट्रासाऊंड जेल आणि विविध वैद्यकीय कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.

या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉ. स्वाती पवार यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी म्हणून डॉ. राहुल भणगे आणि एजंट अभिजीत भुसाळ यांची नावे समोर आली आहेत. या संपूर्ण प्रकारावर PCPNDT Act 1994 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यासोबतच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायदा आणि भारतीय न्याय संहिता कलम 223 अंतर्गतही कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

या कायद्यांनुसार दोषी ठरल्यास आरोपींना कठोर शिक्षा, मोठा दंड आणि डॉक्टरचा परवाना कायमचा रद्द होण्याची शक्यता आहे. पोलिस तपासात या रॅकेटचा विस्तार केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित नसून त्यामागे मोठं जाळं कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जप्त कागदपत्रे आणि संपर्कांच्या आधारे पोलिस आता या संपूर्ण साखळीचा मागोवा घेत असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुलींच्या जन्मावर घाला घालणाऱ्या या अमानुष कृत्याविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. राहता येथील ही कारवाई केवळ एका रॅकेटचा भंडाफोड नसून समाजातील विकृत मानसिकतेवर आणि आरोग्य व्यवस्थेतील काळ्या प्रवृत्तीवर केलेला थेट प्रहार आहे. आता प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून संपूर्ण नेटवर्क उघड करणे आणि अशा गुन्ह्यांना कायमचा आळा घालणे हीच काळाची गरज ठरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live