बारामती : महान्यूज लाईव्ह
तुझ्यावर काळी विद्या झाली आहे… कुटुंब उद्ध्वस्त होईल… माझ्याकडे उपाय आहे… अशा भीतीदायक धमक्या देत महिलांना मानसिक जाळ्यात अडकवून लाखो रुपयांची उकळपट्टी करणाऱ्या भोंदू मौलाना आणि त्याच्या टोळीचा बारामती शहर पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे.
गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपी मौलाना अब्दुल हलीम शेख हा थेट काश्मीरला पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मौलाना अब्दुल हलीम शेख आणि त्याच्या साथीदारांविरोधात अंधश्रद्धा पसरवणे, काळी जादू व तांत्रिक उपायांच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणे, महिलेशी गैरवर्तन, विनयभंगाचा प्रयत्न आणि धमकी देणे अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 194/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 316, 318(4), 351(2), 74, 75, 3(5) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व काळी जादू प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःला "मौलाना", "तांत्रिक उपाय करणारा" आणि "काळी विद्या दूर करणारा" म्हणून लोकांसमोर सादर करत होता. "दरबार" भरवून नागरिकांच्या कौटुंबिक, आर्थिक आणि वैयक्तिक अडचणी दूर करण्याचे खोटे आश्वासन देत तो महिलांमध्ये भीती निर्माण करत होता. "वाईट शक्ती तुझ्या मागे लागल्या आहेत", "कुटुंबावर संकट येईल", "माझा उपाय नाही केला तर विनाश होईल" अशा शब्दांनी मानसिक दबाव टाकून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचे समोर आले आहे. फिर्यादी महिलेकडून आरोपी आणि त्याच्या टोळीने रोख रक्कम, चेक तसेच PhonePe, UPI व्यवहारांद्वारे लाखोंची रक्कम घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या हाती WhatsApp चॅट, कॉल रेकॉर्ड, मोबाईल डेटा आणि ऑनलाइन व्यवहारांचे महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे लागले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, तथाकथित "तांत्रिक उपाय" करण्याच्या बहाण्याने आरोपी हा महिलेला रात्री- अपरात्री बोलावत होता. यावेळी तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. "काळी विद्या करेन", "तुझ्या कुटुंबाचा नाश होईल" अशा धमक्या देत आरोपीने महिलेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते.
गुन्हा दाखल होणार असल्याची चाहूल लागताच आरोपी अब्दुल हलीम शेख हा काश्मीरमध्ये पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या बारामती शहर पोलीस त्याचा मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे तांत्रिक तपास करत आहेत. आरोपीला लवकरच बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव करत आहेत.
दरम्यान, आरोपीने इतर महिलांनाही अशाच प्रकारे अंधश्रद्धा, तांत्रिक उपाय, आर्थिक फसवणूक किंवा मानसिक छळाच्या जाळ्यात अडकवले आहे का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून, अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे सांगितले आहे. संबंधितांची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याची ग्वाहीही पोलिसांनी दिली आहे.
सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार आणि तथाकथित धार्मिक उपायांच्या माध्यमातून वाढत चाललेल्या भोंदूगिरीच्या पार्श्वभूमीवर या कारवाईकडे बारामती शहरातील मोठी आणि धडक पोलिसी कारवाई म्हणून पाहिले जात आहे.

