Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कष्टकरी आई-वडिलांच्या स्वप्नांना पोलीस वर्दीची किनार; काजल-पायल शिंदे यांच्या जिद्दीला सलाम!

कष्टकरी आई-वडिलांच्या स्वप्नांना पोलीस वर्दीची किनार; काजल-पायल शिंदे यांच्या जिद्दीला सलाम!

विक्रम वरे : महान्यूज लाईव्हसोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वाघळवाडीमध्ये राहणारे शिंदे कुटुंब सहा बहिणी आणि एक भाऊ असलेल्या साध्या कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या काजल आणि पायल शिंदे यांनी आज केवळ स्वतःचेच नाही,तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उजळून टाकले आहे.वयाच्या अवघ्या वीसाव्या वर्षी पायल अनिता संजय शिंदे आणि एकोणीसाव्या वर्षी काजल अनिता संजय शिंदे यांनी पहिल्याच प्रयत्नात मुंबई शहर पोलीस दलात निवड मिळवत संपूर्ण परिसराची मान अभिमानाने उंचावली आहे.

पायलने बारावीत आर्ट्स शाखेत ७० टक्के गुण मिळवत शिक्षण सुरू ठेवले,तर काजलने सायन्स शाखेत ५९ टक्के गुण मिळवत अभ्यासाची वाट सोडली नाही.घरची परिस्थिती, जबाबदाऱ्या आणि संघर्ष यांच्याशी झुंज देत त्यांनी अभ्यास आणि पोलीस भरतीची तयारी यांचा समतोल साधला.त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा संघर्षाचा होता; पण त्या कधी थांबल्या नाहीत.

शिक्षण घेऊन शासकीय सेवेत जाणारी ही त्यांच्या घरातील पहिलीच पिढी ठरली असून, शिंदे कुटुंबाचा आनंद शब्दांत मावणारा नाही.आयुष्यभर कष्टाच्या ओझ्याखाली जगलेल्या या कुटुंबासाठी मुलींच्या अंगावर चढलेली पोलीस वर्दी म्हणजे जणू संघर्षाच्या जखमांवर उमटलेला अभिमानाचा हात आहे.काजल आणि पायल यांच्या यशाने वाघळवाडी परिसरात प्रेरणेची नवी पहाट उगवली आहे.त्यांच्या प्रवासाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की,परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द,चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन असेल,तर स्वप्नांना पंख फुटतातच.

या यशामागे केवळ दोन मुलींची मेहनत नाही,तर तीन पिढ्यांच्या घामाने भिजलेला संघर्ष दडलेला आहे.आजी आजोबा आणि आई वडिलांनी इतरांच्या शेतात शेतमजुरी,उन्हातान्हात मातीशी दोन हात करणे,दगड फोडत संसाराचा गाडा ओढणे.हेच त्यांच्या आजी-आजोबांचे,आई वडिलांचे आयुष्य होते.कष्टाच्या घामाने त्यांनी संसार उभा केला;पण त्यांच्या मनात एक वेदना कायम होती "आपल्या लेकरांच्या वाट्याला हेच आयुष्य येऊ नये."

हीच वेदना पुढच्या पिढीने स्वप्नात बदलली.वडिलांनी स्वतःच्या कष्टांची पर्वा न करता मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान केले. मुलींना केवळ शिकवलेच नाही तर त्यांना कुस्तीच्या मैदानातही उतरवले.आणि कुस्तीतही मुलींनी नाव उज्वल केले.शरीराने मजबूत आणि मनाने खंबीर बनवत त्यांनी मुलींमध्ये लढण्याची ताकद निर्माण केली.आणि त्या ताकदीचेच आज सोनं झालं आहे.

स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत त्यांनी शिक्षणाची नवी दिशा मिळवली.तेथे अभ्यासाला धार मिळाली,तर संस्थेचे गणेश सावंत यांचे मार्गदर्शन त्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे ठरले. मैदानी सरावासाठी अंकुश दोडमिसे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे त्यांना ताकद मिळाली,पण मनातही आत्मविश्वासाचे बळ निर्माण झाले.आज शिंदे भगिनींची ही यशोगाथा केवळ एका कुटुंबाचा विजय नाही; तर प्रत्येक कष्टकरी आई-वडिलांच्या स्वप्नांचा विजय आहे.मातीशी झुंज देणाऱ्या हातांनी आज पोलीस वर्दीचा सन्मान मिळवला आहे. संघर्षाच्या अंधारातून उगवलेला हा यशाचा सूर्य आता अनेक मुलींना स्वप्न पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्याचे धाडस देत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live