Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मजूरीपासून ज्या इमारतीत इलेक्ट्रिक फिटींगपर्यंतची कामं..त्याच बारामती न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदापर्यंत.! संघर्ष, जिद्द आणि यशाची प्रेरणादायी कहाणी!

मजूरीपासून ज्या इमारतीत इलेक्ट्रिक फिटींगपर्यंतची कामं..त्याच बारामती न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदापर्यंत.! संघर्ष, जिद्द आणि यशाची प्रेरणादायी कहाणी!

अॅड शुभम निंबाळकर, इंदापूर

काही व्यक्तींचं आयुष्य हे फक्त त्यांचं वैयक्तिक यश नसतं; ते संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी आशेचा किरण आणि प्रेरणेचा दीपस्तंभ ठरतं. बारामती वकील संघटनेच्या बिनविरोध अध्यक्षपदी ॲड.

सचिन वाघ यांची झालेली निवड ही अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची साक्ष आहे.

आज ज्या भव्य जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत ते अध्यक्ष म्हणून नेतृत्व करणार आहेत, त्याच इमारतीच्या उभारणीच्या काळात त्यांनी इलेक्ट्रिकल कामगार म्हणून विद्युत फिटिंगचे काम केले होते. फॅन, ट्यूबलाईट, वायरिंग आणि इतर इलेक्ट्रिकल फिटिंग करत त्यांनी त्या इमारतीच्या उभारणीत आपले श्रम दिले होते. त्या वेळी त्यांच्या हातात साधनं होती, अंगावर घाम होता; पण मनात एक अढळ स्वप्न होतं-”एक दिवस याच न्यायालयात काळा कोट परिधान करून न्यायासाठी लढायचं.”

परिस्थिती प्रतिकूल होती. आर्थिक अडचणी होत्या. अनेक संकटे होती. मात्र स्वप्नांवरचा विश्वास कधीही डळमळला नाही. अथक परिश्रम, शिक्षणाची जिद्द आणि स्वतःच्या कर्तृत्वावर असलेल्या विश्वासाच्या बळावर त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि सन २००६ मध्ये बारामती येथे वकिली व्यवसायाची सुरुवात केली.

वकिलीच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक दिवस ही एक नवी परीक्षा होती. प्रत्येक खटला, प्रत्येक युक्तिवाद आणि प्रत्येक आव्हान स्वीकारत त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्ती, निर्भीड मांडणी, प्रामाणिक काम आणि सहकाऱ्यांशी जपलेल्या विश्वासाच्या नात्यामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली…आणि मग आला आयुष्यातील तो सुवर्णक्षण.

ज्या न्यायालयाच्या इमारतीत कधीकाळी इलेक्ट्रिकल कामगार म्हणून त्यांनी फॅन, ट्यूबलाईट आणि विद्युत फिटिंगचं काम केलं होतं, त्याच इमारतीतील बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. हा केवळ एका पदाचा सन्मान नाही; हा संघर्षावर मिळालेला विजय, कष्टांचं फळ आणि जिद्दीचा सर्वोच्च सन्मान आहे.

ही कहाणी आपल्याला शिकवते की परिस्थिती माणसाचा वर्तमान ठरवू शकते, पण त्याचं भविष्य नाही. भविष्य घडवत असतात त्याची स्वप्नं, त्याची मेहनत, त्याची चिकाटी आणि स्वतःवरचा अढळ विश्वास. ॲड. सचिन वाघ यांचा प्रवास प्रत्येक तरुणाला एकच संदेश देतो, संघर्ष हा यशाचा शत्रू नसतो; तोच यशाचा पाया असतो. स्वप्न मोठं असेल, जिद्द प्रामाणिक असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर नियतीही एक दिवस तुमच्या यशासाठी टाळ्या वाजवते.

खरंच, माणूस कुठून सुरुवात करतो यापेक्षा, तो आपल्या कर्तृत्वाने कुठपर्यंत पोहोचतो हेच त्याच्या आयुष्याचं खरं मोजमाप असतं. आता बारामती वकील संघटनेच्या बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली. ॲड. सचिन वाघ यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन अशासाठी की, ही केवळ एका वकिलाची यशोगाथा नाही… तर प्रत्येक संघर्ष करणाऱ्या माणसाच्या स्वप्नांना नवी दिशा देणारी आणि मेहनतीचं फळ एक ना एक दिवस नक्की मिळतं याची जिवंत साक्ष आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live