पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. १ मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.
आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत स्थानिक ग्रामस्थांनी नवले पूल परिसरात रास्ता रोको आंदोलनही केले होते.
या प्रकरणातील पीडित मुलीचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला असून त्यात काही अत्यंत गंभीर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. अहवालानुसार, मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट संकेत आढळले आहेत. तसेच तिचा जीव घेण्यासाठी आरोपीने अमानुष पद्धतीचा अवलंब केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. आरोपीने तिच्या तोंडात पायमोजा कोंबला तिच्यावर अत्याचार केले असे निष्पन्न झाले आहे. या निष्कर्षांमुळे घटनेचे गांभीर्य आणखी वाढले असून समाजात संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी आपल्या पालकांसोबत पुण्यात राहत होती आणि उन्हाळी सुट्टीसाठी नसरापूर येथे आजोळी आली होती. खेळत असताना आरोपीने तिला फसवून एका ठिकाणी नेले आणि त्यानंतर हा प्रकार घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीवर यापूर्वीही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पोलिसांकडून सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून लवकरच आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारनेही या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आश्वासन दिले आहे.

