नाशिक : महान्यूज लाईव्ह
निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका सुखी कुटुंबावर काळाने असा काही घाला घातला की, पाहणाऱ्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले. नाशिकजवळील कश्यपी धरणाच्या परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
धरणाच्या पाण्यात बुडणाऱ्या पतीला आणि शेजारच्या चिमुरड्याला वाचवण्यासाठी एका गरोदर माऊलीने स्वतःच्या आणि पोटातल्या बाळाच्या जिवाची पर्वा न करता थेट धरणात उडी घेतली. मात्र, पाण्याचा विळखा इतका भयानक होता की काळाने या सर्वांनाच आपल्या कचाट्यात ओढले. या दुर्घटनेत एका दोन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचे हसते-खेळते जग तिच्या डोळ्यांदेखत एका क्षणात उद्ध्वस्त झाले.
कुस्तीचे मैदान सोडून तरुणांची धाव, पण…
मिळालेल्या माहितीनुसार, धोंडेगाव परिसरात ही घटना घडली तेव्हा गावात कुस्तीचे मैदान रंगात आले होते. मात्र, धरणावर काही लोक बुडत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावातील तरुणांनी कुस्तीचे मैदान अर्धवट सोडून धरणाकडे धाव घेतली. आपल्या जिवाची पर्वा न करता अनेक तरुणांनी तातडीने पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नशिबाने असा काही घात केला की, तरुणांच्या हाती जिवंत माणसांऐवजी फक्त चौघांचे निष्प्राण देह आले.
आई-बाबा तिथे आहेत… चिमुरडीचा आक्रोश
या संपूर्ण दुर्घटनेतील सर्वात हेलावून टाकणारा प्रसंग म्हणजे, मृत दांपत्याची दोन वर्षांची चिमुरडी. तिचे आई-वडील आणि इतर लोक डोळ्यांदेखत पाण्यात बुडाल्याचे पाहून ती घाबरली होती. “आई-बाबा तिथे आहेत…” असं सांगत ती निष्पाप चिमुकली रडत रडत धरणाच्या दिशेने चालत होती. तिच्या या आक्रोशाने घटनास्थळावरील प्रत्येकाचे डोळे पाणावले.
काळ जिंकला अन् माया हरली…
एका गरोदर माऊलीने आपल्या पतीला आणि शेजारच्या मुलाला वाचवण्यासाठी दाखवलेले धाडस तिची अथांग माया दर्शवणारे होते. मात्र, धरणाच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अखेर काळाचा विजय झाला आणि एका माऊलीची माया हरली. पोटच्या गोळ्यासह तिने जगाचा निरोप घेतला.
संपूर्ण महाराष्ट्र हळहळला
निसर्गाच्या कुशीत विखुरलेल्या या कुटुंबाच्या दुर्दैवी अंताने संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र हळहळत आहे. या घटनेमुळे धोंडेगाव आणि परिसरात शोककळा पसरली असून, पर्यटनाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या त्या अनाथ चिमुरडीवर हे डोंगराएवढे दुःख सहन करण्याची वेळ आली आहे.

