बारामती, दि. ४ ऑगस्ट : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला बारामती जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
तसेच न्यायालयाने आरोपीस दंडाचीही शिक्षा ठोठावली.
या प्रकरणातील आरोपी विलास दादा नेटके (रा. सहजपूर, ता. दौंड, जि. पुणे) याने १५ जुलै २०२० रोजी पत्नी ललिता विलास नेटके हिच्यावर चारित्र्याच्या संशयातून लोखंडी हातोड्याने डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली होती. या घटनेप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्यात सरकार पक्षाने एकूण नऊ साक्षीदार तपासले. जखमी ललिता नेटके, तिचा मुलगा सुमेश, तपासी अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शलाका लोणकर यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. विशेष सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी सरकार पक्षाची प्रभावी बाजू मांडली.
पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून बारामती येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा, तसेच कलम ३२३ अंतर्गत सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन तपासी अधिकाऱ्यांनी केला होता. न्यायालयीन कामकाजादरम्यान यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी किशोर वागज यांनी केस अधिकारी म्हणून काम पाहिले. पोलीस हवालदार वेणूनाद ढोपरे, गोरख कसपटे आणि ए. जे. कवडे यांनीही तपास व खटल्याच्या कामकाजात सहकार्य केले.

