Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग.. पाटस, वरवंड, वाखारी, भांडगाव बनले जीवघेण्या अपघातांचे केंद्र!

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग.. पाटस, वरवंड, वाखारी, भांडगाव बनले जीवघेण्या अपघातांचे केंद्र!

पुणे-सोलापूर महामार्गावरील कामाचा वेग जितका वाढायला हवा होता, तितकाच निष्काळजीपणाही वाढल्याचं चित्र सध्या दिसतंय - आणि त्याची किंमत वाहनचालकांना अपघातांच्या रूपाने मोजावी लागत आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस, वरवंड, वाखारी आणि भांडगाव परिसर सध्या अपघातांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्यावरील सुरू असलेल्या कामांमध्ये ठेकेदाराकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे अपघातांची मालिका वाढत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी केला आहे.

सोमवारी (दि. ४) वाखारी-चौफुला येथे एक कार रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सध्या या मार्गावर चौपदरीकरण, सेवा रस्ते आणि उड्डाणपूलांची कामे सुरू आहेत. मात्र, काम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक असलेली कोणतीही सुरक्षा व्यवस्था दिसून येत नाही. 'काम सुरू आहे' किंवा 'धोक्याची सूचना' देणारे फलक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स, डायव्हर्जनची स्पष्ट व्यवस्था नसल्याने वाहनचालक गोंधळात पडत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी पथदिव्यांचा अभाव असल्यामुळे खड्डे, मुरूमाचे ढिगारे आणि खडी सहज दिसत नाहीत, ज्यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढते.

अनेक ठिकाणी रस्ते अर्धवट खोदलेले असून मुरूम व खडी रस्त्यावर पसरलेली आहे. यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना रोजच्या झाल्या आहेत. कामाचा वेग मंदावलेला असून अनेक महिने हे काम प्रलंबितच असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महामार्गाचे काम सुरू असताना ठेकेदाराने वाहनचालक किंवा रस्ता सुरक्षेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. केवळ कामाचा देखावा सुरू असून प्रत्यक्षात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पाटस ते भांडगाव दरम्यान दर आठवड्याला गंभीर अपघात घडत आहेत,अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

या मार्गावरून शाळकरी मुले, शेतकरी, कामगार आणि इतर प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे संबंधित ठेकेदार कंपनीला तात्काळ सुरक्षा नियमांचे पालन करण्यास भाग पाडावे आणि रखडलेली कामे लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने दखल घेऊन या जीवघेण्या परिस्थितीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live