Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रंगमंच अमेरिकेचा. पण आवाज घुमला इनामगावच्या मातीतला! महाराष्ट्रातील कलाकारांचा अमेरिकेत कलाविष्कार; 'द फोक आख्यान'ने जिंकली रसिकांची मने!

रंगमंच अमेरिकेचा. पण आवाज घुमला इनामगावच्या मातीतला! महाराष्ट्रातील कलाकारांचा अमेरिकेत कलाविष्कार; 'द फोक आख्यान'ने जिंकली रसिकांची मने!

शिरूर : महान्यूज लाईव्ह

हाराष्ट्राच्या लोककलेचा आणि सांस्कृतिक परंपरेचा आविष्कार करणाऱ्या 'फोक आख्यान' या कार्यक्रमाने अमेरिकेतील रसिकांची मने जिंकली आहेत. तर महाराष्ट्रातील कलाकारांनी अमेरिकेचे रंगमंच लोककला सादर करत अक्षरश; दणाणून सोडले.

महाराष्ट्रातील कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाचे अमेरिकेतील सिएटल, सॅन होजे, ह्युस्टन, डॅलस, वॉशिंग्टन डी.सी. आणि न्यू जर्सी या सहा शहरांत कार्यक्रम झाले. अमेरिकेतील मराठी तसेच भारतीय प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या “द फोक आख्यान” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अमेरिकेत आयोजन करण्यात आले होते. या अनुभवाबद्दल शिवशाहीर चंद्रकांत माने यांनी संवाद साधत या दौऱ्याविषयी अधिक माहिती दिली. ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेत दाखल झालेल्या 'द फोक आख्यान'च्या चमूमध्ये कलाकार, वादक, तंत्रज्ञ आणि बॅकस्टेज टीमसह एकूण ३१ जणांचा सहभाग होता. अमेरिकेत दोन ते तीन हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या भव्य थिएटरमध्ये कार्यक्रम सादर करण्याचा अनुभव कलाकारांना मिळाला. डॅलस येथील Opera House Theatre मध्ये झालेला कार्यक्रम या दौऱ्यातील विशेष अनुभव ठरला.

'द फोक आख्यान'चे प्रमुख गायक आणि शिरूर तालुक्यातील इनामगावचे शिवशाहीर चंद्रकांत ज्ञानदेव माने यांनी अमेरिकेतील अनुभव सांगताना महाराष्ट्र आणि आपल्या गावाशी असलेली नाळ अधोरेखित केली. "अमेरिकेतील मराठी आणि भारतीय लोकांनी कार्यक्रमाला खूप प्रेम दिले. महाराष्ट्रातील कार्यक्रम इतक्या दूर अमेरिकेत येऊन भव्य स्वरूपात सादर होत असल्याचा त्यांना विशेष आनंद होता. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून कलाकार म्हणून समाधान मिळाले," असे माने यांनी सांगितले.

अमेरिकेतील भव्य थिएटरचा अनुभवही त्यांनी सांगितला. "सिएटलपासून डॅलसपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या थिएटरमध्ये कार्यक्रम झाले. डॅलसमधील Opera House Theatreचा अनुभव विशेष होता. अशा मोठ्या रंगमंचावर महाराष्ट्राची लोककला सादर करण्याची संधी मिळणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे," असे ते म्हणाले.

इनामगावचे नाव सांगताना अभिमान…

परदेशातील कार्यक्रमांदरम्यान आपल्या गावाचे नाव अभिमानाने सांगत असल्याचे माने यांनी नमूद केले."मी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तरी माझ्या इनामगावचे नाव अभिमानाने सांगतो. इनामगावला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. गावात उत्खनन झाले आहे, तसेच ऐतिहासिक मंदिरांचाही वारसा आहे. त्यामुळे माझ्या गावाचे नाव जगात सांगताना अभिमान वाटतो. इथला अनुभव चांगला आहे. मात्र काही दिवस राहिल्यानंतर महाराष्ट्राची आणि गावाची आठवण येते. कधी इनामगावला जातोय, आपल्या माणसांना भेटतोय आणि तिथली भाजी- भाकरी खातोय, असे वाटत राहते. आपल्या गावातील माणसांचे प्रेम आणि आपुलकी वेगळी आहे," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

३१ जणांची टीम

'द फोक आख्यान'या कार्यक्रमाचे निर्माते रणजित गुगळे आणि भूषण मेहेरे आहेत. तर आख्यानाची मूळ संकल्पना हर्ष राऊत आणि विजय कापसे यांची असून लेखन व गीतलेखन ईश्वर अंधारे यांनी केले आहे. प्रमुख गायक म्हणून शिवशाहीर चंद्रकांत माने, ऋषिकेश रिकामे, अनुजा देवरे आणि रुचा कुलकर्णी यांचा सहभाग आहे. वादक, तालवादक, हार्मोनियम व पायपेटी वादक, बासरी व पावरी वादक, कोरस, साऊंड व लाईट इंजिनिअर, बॅकस्टेज, कपडेपट, सनई आणि सोशल मीडिया टीम अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणारे एकूण ३१ जण या दौऱ्यात सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातील लोककलेला अमेरिकेतील रंगमंचावर सादर करण्याच्या या दौऱ्यामुळे कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव मिळाला.त्याचवेळी अमेरिकेतील मराठी समाजाने आपल्या मातीतल्या कलेला दिलेला प्रतिसाद आम्ही विसरू शकत नाही अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live