Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शेतकऱ्यांना लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

शेतकऱ्यांना लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद

काका यादव, भवानीनगर

वालचंदनगर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या शेतीपयोगी साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप वाहन, मोटार पंप तसेच चोरीसाठी वापरलेले वाहन असा सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर, ट्रॉली, मोटार पंप, केबल वायर आदी साहित्याच्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यानुसार वालचंदनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास करत संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान जयदीप नानासो घोळवे, मेघराज नानासो ओंबासे आणि त्याचा साथीदार आकाश विलास शिंदे (सर्व रा. निंबोडी, ता. इंदापूर) या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून एक ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप वाहन, सौर मोटार पंप तसेच चोरीसाठी वापरलेले वाहन असा सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, संबंधित शेतकऱ्यांना मुद्देमाल परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वालचंदनगर पोलीस करत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस हवालदार कीर्तीलाल गायकवाड, अजित थोरात, परिमल मानेर, अजित भाग्यवंत, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजीत कळसकर आणि राहुल माने यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live