सोलापूर : स्वतःला दैवी शक्तीचा अवतार असल्याचे भासवून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा यांच्या विरोधात आणखी एक गंभीर गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
या नव्या तक्रारीत एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच तिच्याकडून उपचारांच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर भोसलेविरुद्ध नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या सहावर पोहोचली असून, संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी सोलापूर पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे दाजी आजारी असल्याने विविध उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यानंतर ओळखीच्या व्यक्तीच्या सल्ल्याने ती २०२४ मध्ये घोटी येथील मनोहर भोसलेच्या आश्रमात गेली होती. दाजींना बरे करण्यासाठी विविध धार्मिक विधी करण्याचे सांगत भोसले आणि त्याच्या नाथबाबा नावाने ओळखल्या जाणाऱ्या सहकाऱ्याने मिळून महिलेकडून सुमारे १ लाख ६४ हजार रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, त्यानंतर अमावस्येच्या रात्री विशेष विधी करण्याचे कारण सांगत भोसलेने महिलेवर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. महिलेने नकार दिल्यानंतर पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. शुद्धीवर आल्यानंतर महिलेने करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अत्याचार, फसवणूक आणि अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. हे पथक भोसलेविरुद्ध दाखल सर्व गुन्ह्यांचा एकत्रित आणि सखोल तपास करणार आहे.
दरम्यान, तपासादरम्यान मनोहर भोसलेने विविध आश्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती उभी केल्याची माहिती समोर आली असून, त्याच्या मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू आहे. विविध ठिकाणच्या आश्रमांची झाडाझडती घेण्याचे काम सुरू असून, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये तपास पुढे सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

