Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोशल मिडियाच्या दुनियेत स्टार.. पण आयुष्यात हरली; रोहिणी पाराध्येची धक्कादायक आत्महत्या!

सोशल मिडियाच्या दुनियेत स्टार.. पण आयुष्यात हरली; रोहिणी पाराध्येची धक्कादायक आत्महत्या!

मंगळवेढा : महान्यूज लाईव्ह

इंस्टाग्राम रिल्सवर लाखो लोकांना हसवणारी, गावरान शैलीतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली रिलस्टार रोहिणी पाराध्ये अखेर स्वतःच्याच आयुष्याच्या संघर्षापुढे हरली.

हॉटेल ग्रामपंचायत या नावाने सोशल मीडियावर घराघरात पोहोचलेली रोहिणी हिने स्वतःच्या हॉटेलच्या किचनमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

स्क्रीनवर कायम हसतमुख दिसणाऱ्या रोहिणीच्या मृत्यूने सोशल मीडिया प्रसिद्धीच्या झगमगाटामागचं भीषण वास्तव पुन्हा उघड केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे ही धक्कादायक घटना घडली. रोहिणी आणि तिचे पती निलेश पाराध्ये यांनी हॉटेल ग्रामपंचायत या नावाने व्यवसाय उभा केला होता.

ग्रामीण जीवनशैली, नवरा-बायकोमधील संवाद, गावरान जेवण आणि हलक्याफुलक्या व्हिडिओंमुळे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले होते. लाखो व्ह्यूज, हजारो कमेंट्स आणि वाढती प्रसिद्धी यामुळे हॉटेल ग्रामपंचायत हे नाव सोशल मीडियावर ब्रँड बनत होतं. पोलिसांच्या प्राथमिक तपासात व्यवसायातील वाढता ताण, आर्थिक जबाबदाऱ्या आणि कौटुंबिक मतभेद याची माहिती समोर येत आहे.

हॉटेल ग्रामपंचायतच्या नव्या शाखा सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. व्यवसाय वाढत होता, पण त्याचबरोबर ताणही वाढत होता. पैशांचा ताण, व्यवस्थापनातील अडचणी आणि वैयक्तिक आयुष्यातील मतभेद यामुळे रोहिणी मानसिक दबावाखाली होती का? याचा तपास सुरू आहे.

घटनेच्या दिवशी दुपारी रोहिणी हॉटेलच्या किचनमध्ये गेली आणि काही वेळानंतर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी काही तासांपर्यंत ती सोशल मीडियावर सक्रिय होती. तिचं शेवटचं रिल आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात ती हसत-खेळत स्वयंपाक करताना दिसते. त्यामुळे कॅमेऱ्यासमोरचं हसू आणि कॅमेऱ्यामागचं दुःख हा विरोधाभास आता सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून रोहिणीचा मोबाईल, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया चॅट आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. आत्महत्येपूर्वी कोणाशी संवाद झाला होता, कोणता मानसिक दबाव होता, कोणत्या कारणामुळे इतकं टोकाचं पाऊल उचललं गेलं या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

दरम्यान, रोहिणीचा हा दुसरा विवाह असल्याची माहिती मिळत असून, त्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधांमधील तणावाचाही तपास सुरू असल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. रोहिणी पाराध्येच्या मृत्यूने सोशल मीडिया स्टारडमच्या मागील काळी बाजू पुन्हा समोर आणली आहे.

फॉलोअर्स, लाईक्स आणि व्हायरल रिल्सच्या जगात बाहेरून सर्व काही परफेक्ट दिसत असलं तरी वास्तवात मानसिक तणाव, स्पर्धा आणि वैयक्तिक संघर्ष किती भयंकर असू शकतो याचं हे धक्कादायक उदाहरण मानलं जात आहे. एकीकडे रिल्सवर लाखोंना हसवणारी रोहिणी आणि दुसरीकडे स्वतःच्या आयुष्याशी हरलेली रोहिणी या दोन वास्तवांमधील अंतर आता संपूर्ण महाराष्ट्राला अस्वस्थ करून गेलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live