विक्रम वरे : महान्यूज लाईव्हबारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे.
तब्बल २ लाख १८ हजार ९६९ मतांच्या फरकाने मिळालेल्या या विजयामुळे बारामतीचा राजकीय दबदबा पुन्हा एकदा राज्यासह देशपातळीवर अधोरेखित झाला आहे. या अभूतपूर्व निकालानंतर शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया देताना हा विजय "देशात एक रेकॉर्ड" असल्याचे म्हटले आहे.
युगेंद्र पवार म्हणाले की, बारामतीकरांनी मोठा निर्णय घेत इतिहास घडवला आहे.त्यांनी सांगितले की,सोशल मीडियाच्या माध्यमातून युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले आहे.या विजयामागे विकासकामांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. अजितदादांच काम इथे मोठ्या प्रमाणात होतं.बारामतीकरांनी त्यांना श्रद्धांजली म्हणून इतक्या मोठ्या मताधिक्याने सुनेत्रा पवार यांना निवडून दिलं, असे ते म्हणाले.
युगेंद्र पवार यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, बारामतीतील मतदार अत्यंत जागरूक आहेत. जो कोणी चांगलं काम करेल,बारामतीकरांशी सातत्याने संवाद ठेवेल आणि त्यांच्यासाठी वेळ देईल, त्यालाच जनता निवडेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यातील राजकारणात कामगिरी आणि जनसंपर्क यालाच महत्त्व राहणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान,२०२९ च्या विधानसभा निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी सावध भूमिका घेतली."२०२९ साठी अजून तीन- साडेतीन वर्षांचा कालावधी आहे. सर्वांना आपापलं कर्तृत्व सिद्ध करू द्या. बारामतीकर हुशार आहेत, ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असे ते म्हणाले. थोडक्यात 2029 मध्ये युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी राजकीय चर्चा रंगत असली तरी, अंतिम निर्णय हा जनतेच्याच हातात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

