Thursday, 22 Jul, 6.36 pm महान्यूज LIVE

होम
वाईतील देवरुखवाडीतील वस्तीवर माळीणची पुनरावृत्ती..! दरड कोसळली.५ ते ६ घरांवर कोसळली दरड.१५ वाचवले; ५ जण अडकले

प्रशासनाकडून मदतकार्य युध्दपातळीवर सुरु..! आमदार मकरंद पाटील घटनास्थळी प्रशासनासह दाखल

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह

साताऱ्यासह महाबळेश्वर ,जावळी तालुक्यात पावसाचा कहर सुरु असून मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील माळीणची पुनरावृत्ती सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये देवरुखवाडी याठिकाणी घडली आहे. यामध्ये देवरुखवाडी या वस्तीवर पाच ते सहा घरांवर रात्री साडेआठच्या सुमारास अचानकपणे दरड कोसळून वीस रहिवासी अडकल्याने खळबळ उडाली.

या परिसरामध्ये साधारणपणे वीस घरे असून त्यातील पाच ते सहा घरे त्यातील कुटूंबियांसह पडलेल्या दरडीखाली २० लोक अडकले. त्यातील १५ लोकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रशासन व आरोग्य व्यवस्था घटनास्थळी पोहोचली असून जेसीबीच्या माध्यमातून दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

या घरातून बाहेर काढलेले दोन-तीन लोक अत्यवस्थ असून त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, वाई तालुक्याच्या पश्चिम भागात धोम धरणाच्या लगत देवरुखकरवाडी या वस्तीवर रात्री साडेआठच्या सुमारास अचानकपणे माळीणची पुनरावृत्ती घडत दरड कोसळली. या वस्तीवर वीस घरे असून पाच ते सहा घरांवर दरड कोसळली आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली २० हून अधिक लोक अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यापैकी १५ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

दरड कोसळल्याची माहिती मिळताच वाई- खंडाळा- महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील, वाई तहसीलदार रणजीत भोसले, वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस कर्मचारी असे सर्व प्रशासन आरोग्य व्यवस्था रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झाले

यामध्ये चार जेसीबी द्वारा युद्धपातळीवर दरड बाजूला हटविण्याचे काम सुरू असून मदतकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. दरडी खालून काढलेले तीन लोक अत्यवस्थ असून त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा भाग दुर्गम असल्यामुळे आणि या मार्गावरील रस्ते व पूल मुसळधार पावसात वाहून गेल्यामुळे जागेवर पोहोचण्यात व मदत कार्यात प्रशासनाला अडचणी मोठ्या प्रमाणात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live
Top