Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदिर, पिंपळीच्या सान्वी महाडीकची पुण्यात बाजी..!

विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदिर, पिंपळीच्या सान्वी महाडीकची पुण्यात बाजी..!

स्वलिखित नाट्यछटेने विभागीय अंतिम फेरीत द्वितीय क्रमांक..

बारामती : बाल रंगभूमी परिषद आयोजित स्व. मनीषाताई भाऊसाहेब भोईर नाट्यछटा स्पर्धा २०२६ च्या पुणे येथे पार पडलेल्या विभागीय अंतिम फेरीत विद्या प्रतिष्ठानच्या न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी सान्वी अमरेन्द्र महाडीक हिने इयत्ता ८ वी व ९ वीच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.

विशेष म्हणजे, सान्वीने सादर केलेली 'माझा डाएट उद्यापासून सुरू' ही नाट्यछटा तिची स्वतःची लेखनकृती असून, स्वलिखित नाट्यछटेच्या प्रभावी सादरीकरणातून तिने हे यश मिळवले आहे.

सान्वीच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत उपमुख्यमंत्री व विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार यांनी तिचे अभिनंदन केले. सान्वीने आपल्या कलागुणांच्या जोरावर शाळेसह बारामतीचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांनी तिचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेच्या विविध २६ केंद्रांवर २,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यातून सुमारे २६० विद्यार्थी अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. विविध गटांतील गुणवंतांना एकूण ६४ पारितोषिके प्रदान करण्यात आली. सान्वी सहभागी असलेल्या इयत्ता ८ वी व ९ वीच्या गटात तब्बल ४६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अशा अत्यंत चुरशीच्या गटातून अंतिम फेरीत मजल मारत सान्वीने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर द्वितीय पारितोषिकावर आपले नाव कोरले.

दैनंदिन जीवनातील 'डाएट' या विषयाकडे विनोदी आणि मिश्कील नजरेने पाहणारी 'माझा डाएट उद्यापासून सुरू' ही नाट्यछटा सान्वीने स्वतः लिहिली. विषयाची कल्पक मांडणी, सहज संवादफेक, आत्मविश्वासपूर्ण अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग यामुळे तिच्या सादरीकरणाने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. लेखन आणि अभिनय या दोन्ही पातळ्यांवर स्वतःची प्रतिभा सिद्ध केल्यामुळे सान्वीचे हे यश विशेष ठरले आहे.

अंतिम फेरीसाठी आकाश थिटे, निकिता वाणी, स्वप्नील खंबायत, चैताली जाधव आणि प्रीती केसकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. सान्वीच्या या यशामागे शाळेतील ज्योती दिसले व अर्चना देव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या विभागप्रमुख लीला शेट्टी यांनी तिला सातत्याने प्रोत्साहन दिले. सान्वीची आई अ‍ॅड. प्रिया अमरेन्द्र महाडीक यांनी नाट्यछटेच्या तयारीपासून अंतिम सादरीकरणापर्यंत तिची विशेष तयारी करून घेत तिला सातत्याने प्रोत्साहन दिले.

पारितोषिक वितरण समारंभास बाल रंगभूमी परिषद (मध्यवर्ती, मुंबई) अध्यक्षा अ‍ॅड. नीलिमा शिर्के-सामंत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज डाळिंबकर यांनी केले, प्रास्ताविक दीपाली शेळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन नारायण करपे यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaNews Live