Saturday, 14 Dec, 7.22 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
आम्ही गांधी-नेहरूंना मानतो, तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका : संजय राऊत

नवी दिल्ली : दिल्लीतील ऐतिहासिक अशा रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.30 वाजता रॅलीला सुरुवात झाली. यावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.यावेळी बोलताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'रेप इन इंडिया'च्या वक्तव्यासाठी माफी मागण्यास नकार दिला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आक्रमक भूमिका घेत माफी मागण्याच्या मुद्यावरून टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, माझं नाव राहुल सावरकर नाही तर राहुल गांधी आहे. माझा मृत्यू झाला तरी मी माफी मागणार नाही. मला भाजप खासदारांनी माफी मागावी असं म्हटलं आहे.

मी योग्य बोललो त्यासाठी माफी मागण्यास सांगितलं जात आहे. माझं नाव राहुल सावरकर नाही. माझं नाव राहुल गांधी आहे. मी सत्यासाठी कधीच माफी मागणार नाही असं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसकडून कोणीही माफी मागणार नाही. नरेंद्र मोदींनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी देशाची माफी मागावी. त्याचे सहाय्यक अमित शाहांनी माफी मागितली पाहिजे अस देखील राहुल गांधी म्हणाले.

सावरकरांच्या विषयावर शिवसेना नेहमीच आक्रमक राहिली आहे. सावरकरांवर टीका करणाऱ्यांचा शिवसेनेने नेहमीच समाचार घेतला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान न राखल्याबद्दल शिवसेनेने काँग्रेसवर आतापर्यंत बरीच टीका केली आहे.पण तीच शिवसेना आता महाराष्ट्रात काँग्रेससोबत सरकारमध्ये आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेसला दुखावणारी भूमिका घेणार का? हा प्रश्न विचारला जात होता .

दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेनेचे फायरब्रांड खासदार संजय राऊत यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. विर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही अशी रोकठोक भूमिका राऊत यांनी मांडली आहे.

पुढे संजय राऊत यांनी आणखी आपली भूमिका स्पष्ट करताना आणखी एक ट्वीट केले आहे ज्यात ते म्हणतात,’आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका.सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. ‘

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top