Wednesday, 19 Sep, 2.10 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
दिमाखात पार पडला 'बॉईज २' चा ट्रेलर

टीम महाराष्ट्र देशा- तरुणाईवर आधारित सिनेमा म्हंटला कि त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच ! खास करून जर तो सिनेमा सुपरहिट ‘बॉईज’ चा सिक्वेल असेल, तर त्या मस्तीला काहीच परिसीमा उरत नाही. येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेला ‘बॉईज २’ हा सिक्वेल’बॉईज’गिरीचा तोच धमाका घेऊन येत आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरचे नुकतेच मोठ्या दिमाखात अनावरण करण्यात आले. मुंबईतील लोअर परेल येथे पार पडलेल्या या ट्रेलर लाँच कार्यक्रमात, तरुणांचा लाडका गायक अवधूत गुप्तेच्या लाईव्ह गाण्याने उपस्थितांची संध्याकाळ शानदार बनली.

‘बॉईज २’ या नावामुळेच अधिक प्रसिद्ध होत असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने उपस्थितांची मने जिंकली. शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकणाऱ्या धैर्या, ढुंग्या आणि कबीरची युथफुल गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रेम आणि रोमान्स जरी दिसून येत असला तरी, आपापसांतील वैर, गटपद्धती आणि त्यांच्यातील वादविवाददेखील आपल्याला पाहायला मिळते. शिवाय ओंकार भोजणे, सोहम काळोखे, सायली पाटील, शुभांगी तांबळे आणि अक्षता पाडगावकर हे नवीन चेहरेदेखील आपल्याला या ट्रेलरमधून दिसून येतात. या नवोदित कलाकारांसोबतच यतीन कार्येकर, गिरीश कुलकर्णी आणि पल्लवी पाटील या प्रसिद्ध कलाकारांचीदेखील यात भूमिका असल्याचे कळून येते.

इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या ‘बॉईज २’ सिनेमाचा हा दमदार ट्रेलर रसिकांचे तुफान मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. विशाल देवरुखकर यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या सिनेमाचे संवादलेखन ऋषिकेश कोळीने केले आहे. तसेच, या तीन अतरंगी मुलांचा दंगा इरॉस इंटरनेशनलद्वारे जागतिक स्तरावरदेखील वितरीत केला जाणार असल्याकारणामुळे, ‘बॉईज २’ चा ‘नॉईस’भारताबाहेरच्या प्रेक्षकांनादेखील अनुभवता येणार आहे.

Trailer Link:

https://www.youtube.com/watch?v=W2b7Dc-bGnI

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top