Saturday, 14 Dec, 7.31 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
एकनाथ खडसेंची इच्छा असेल तर राष्ट्रवादीत त्यांचे स्वागत करू : अजित पवार

पुणे : एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांची इच्छा असेल तर राष्ट्रवादीत स्वागतच करू, असे विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तर आपल्या मंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांना एकनाथ खडसेंच्या नाराजीबाबत विचारले असता पवार यांनी वरील प्रमाणे मत व्यक्त केले. फडणवीस तुम्हाला त्या बंडावरून खलनायक ठरवू पाहताहेत याबाबतची प्रतिक्रिया विचारली असता, ‘नो काॅमेंट्स मला चिडायला लावू नका,” असे उत्तर त्यांनी दिले. पंकजा मुंडेंची नाराजी हा भाजपचा पक्षांतर्गत प्रश्न असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दहा आमदार निवडून आले आहेत. ज्यात तीन आमदारांमागे एक मंत्रीपद याप्रमाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला तीन मंत्रीपदे मिळू शकतात अशी शक्यता अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे तात्पुरते खातेवाटप झाले असले तरी राष्ट्रवादीच्या वाट्याला आणखी एक मंत्रीपद मिळू शकते, असे संकेत पवार यांनी दिले.

दरम्यान, खाते वाटपात सहकार व पणन ही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच बाजार समित्याबाबत अनेक नवे बदल करणे शक्‍य आहे, सहकारी कारखानदारीच्या धोरणाबाबतही सरकार काही बदल करण्याची शक्‍यता असल्याचे पवार यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top