Saturday, 14 Dec, 7.02 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
जाणून घ्या, नाथाभाऊंच्या एकुलत्या एक मुलाने आयुष्य संपविले त्या दिवशी नेमकं काय घडलं ?

टीम महाराष्ट्र देशा : एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पुढारी आहेत. गेल्या काही दिवसात त्यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात मोर्चा उघडल्याने विशेष चर्चेत आहेत. खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर न्यायालयाने दिलासा देवून देखील त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते दुखी होते.

खडसे हे मुक्ताईनगरचे आमदार व माजी महसूल मंत्री होते.२०१० पासून ते २०१४ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पार्टीतर्फे विरोधीपक्ष नेता होते. १९९७-१९९९ या काळात खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यानंतर खडसे महसूल मंत्री बनले, तसेच कृषी मंत्री, अल्पसंख्याक विकास मंत्री बनले.

एक संघर्षशील नेता अशी ओळख असलेल्या नाथाभाऊ यांच्या राजनैतिक जीवनाची सुरुवात कोथळी गावमध्ये सरपंच बनण्यापासून झाली. जेव्हा पहिल्यांदा ते कोथळी ग्रामपंचायतीमध्ये सभासद पदासाठी उभे राहिले तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. नंतर दुसऱ्या वेळी ते निवडून आले. १९८९ मध्ये ते मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी निवडणुकीसाठी उभे राहिले व ते निवडून आले. तेव्हापासून ते मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी अपराजित राहिले .

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते असताना एकनाथ खडसे यांचा एकुलता एक मुलगा निखील खडसे यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. १ मे २०१३ रोजी दुपारी रिव्हॉल्वरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केली. गोळ्या घातल्यानंतर अत्यवस्थ अवस्थेतील निखिल यांना जळगाव येथील गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.

निखिलने 'लाम्बा' कंपनीच्या 9 एमएमच्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेतली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार निखिलने उजव्या कानाच्या दोन इंचावर रिव्हॉल्व्हर टेकवून गोळी झाडली आहे. त्यामुळे तिथे सहा इंच व्यासाचे छिद्र करून गोळी मेंदूत शिरली आणि तिथे ती फुटली. त्यामुळे त्याचा मेंदू आतल्या आत छिन्नविछिन्न झाला होता. त्यामुळे मोठा रक्तस्राव होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला असावा, असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्टच

२०१०मध्ये विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत निखिल खडसे यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनीष जैन यांनी निखिल यांचा पराभव केला होता.

आत्महत्येचं कारण सांगताना काही माध्यमांनी निखिल खडसे राजकीय अपयशाने खचले होते असं म्हटलं होतं. ते तर बऱ्याच दिवसांपासून असाध्य आजारांनी त्रस्त होते त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली अश्या आशयाच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. पण निखिल खडसे यांनी आत्महत्या का केली याची माहिती अजूनही कळू शकली नाही.

निखिल खडसे यांच्यावर कोथळीतील संत मुक्ताई मंदिर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. 35 वर्षीय मुलाला अग्नी देताना खडसे यांना गहिवरून आले, तर निखिल यांचा दोन वर्षांचा मुलगा गुरुनाथला पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. एका लढवय्या बापावर आपल्या तरुण मुलाचे असे जाणे दुखाचा डोंगर कोसळल्यासारखेच होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top