Friday, 23 Aug, 4.26 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
'कार्यकर्त्यांना खुलेपणाने मात्र नेत्यांना फिल्टर लावून भाजपात प्रवेश आम्ही देतोय'

टीम महाराष्ट्र देशा- राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा प्रमाणे दोषींविरोधात कारवाई करु असं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज महाजनादेश यात्रे दरम्यान धुळे इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपात प्रवेश देतांना कार्यकर्त्यांना खुलेपणाने मात्र नेत्यांना फिल्टर लावून प्रवेश दिला जाईल. कोणाला पक्षात घ्यायचं हे तपासूनच घेतले जाईल. असे सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी केलं.

विरोधकांनी भाजपच्या मेगा भरतीची काळजी करण्याऐवजी आपल्या पक्षांला लागलेल्या मेगा गळतीची चिंता करावी, असंही मुख्यमंत्री म्हणाले. धुळे जिल्ह्यातल्या सिंचन प्रकल्पांची पूर्तता तसंच मनमाड-धुळे -इंदूर रेल्वे मार्गाचं भूसंपादन, या अनुषंगाने बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, या भागाच्या विकासासाठी भविष्यातही निधीची कमतरता पडू देणार नाही, असं नमूद केलं.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले,'भाजपच्या महाजनादेश यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमच्या यात्रेनंतर अनेक पक्षांना उत्साह आला आहे आणि त्यांनी देखील यात्रा काढल्या आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. तसेच राज्यातील जनतेला हेच सरकार आपल्या अपेक्षा पूर्ण करेल असं वाटतं आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत.

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महाजनादेश यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती दिली. तसेच सध्या देशात पहिल्या तीन क्रमांकामध्ये महाराष्ट्राचा समावेश असून येणाऱ्या काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचाही निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top