Saturday, 24 Aug, 5.02 am महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
'परळी, केजमध्ये आमचे आमदार होणार नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही'

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे.

या यात्रेनिमित्त आंबेजोगाई येथे आयोजित सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी मोठी प्रतिज्ञा केली आहे. त्यांनी ‘परळी आणि केज मतदारसंघात आमचे आमदार जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही अस विधान केले आहे. तसेच जेव्हा आमदार होतील त्याचवेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन, असेही खासदार अमोल कोल्हे यांनी जाहीर केले.

दरम्यान, परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या सध्या आमदार आहेत. त्यांची लढत ही विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात होण्याची शक्यता आहे. पंकजा या २००९ पासून परळी येथे आमदार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या होणारी लढत ही अत्यंत चुरशीची होणार आहे.

धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी परळी येथे बोलताना ‘मी आपल्यासाठी जी सेवा मागील २४ वर्ष केली. त्याचे फळ मिळण्याची वेळ आज आली आहे. आता तुमच्या या लेकराला जिंकून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत माझ्या भागातला माणूस हा आर्थिक दृष्ट्या मोठा व्हायला हवा हेच माझं स्वप्न आहे. मी तुम्हाला शब्द देतो की, तुमच्या लेकाला आशीर्वाद द्या… या भागाचा चेहरामोहरा पालटून टाकल्याशिवाय थांबणार नाही असं विधान केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top