Saturday, 28 Mar, 5.21 pm महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा
पीककर्ज परतफेडीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ : रिझर्व्ह बँक

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक घोषणा केली आहे. पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी ३ महिन्याची मुदतवाढ देण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे. त्यामुळे आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीककर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना ३० जून पर्यंत त्यांच्या कर्जाची परतफेड करता येणार आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली.

या मुदतवाढीचा लाभ पुणे जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्हा बँकेने खरीप पिकांसाठी सुमारे १२०० तर, रब्बी पिकांसाठी सुमारे २५० कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे. त्यामुळे या मुदतवाढीचा फायदा खरीप आणि रब्बी पिकांसाठी कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना होणार असल्याचेही थोरात यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजनांमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात येत असल्याचे रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार या परतफेडीची मुदत दरवर्षी ३१ मार्च असते. मात्र देशावर आलेल्या या कोरोनाच्या संकटामुळे रिझर्व्ह बँकेने अनेक महतत्वाचे निर्णय घेतले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Desha
Top