Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
३१ मार्चपर्यंत ४५७ कोटीचा निधी खर्च करण्याचे आव्हान

३१ मार्चपर्यंत ४५७ कोटीचा निधी खर्च करण्याचे आव्हान

Maharashtra Dinman 6 months ago

कोल्हापूर : प्रतिनिधी : चालू आर्थिक वर्षात ३१ मार्चपर्यंत ४५७ कोटींचा निधी खर्च करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर ठाकले आहे. चालू आर्थिक वर्षातील ७६४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय निधीपैकी आतापर्यंत ३०७ कोटी रुपये खर्च झाले असून उर्वरित निधी विहीत कालावधीत खर्च करणे आवश्यक आहे असे आदेश जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

या बैठकीत श्री अंबाबाई मंदिर व श्री जोतिबा विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. (Challenge of spending funds of Rs 457 crore)

मंजूर निधीचा प्रभावी आणि पारदर्शक वापर करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सर्व विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करावीत, असे स्पष्ट आदेश सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मंजूर असलेला सर्व निधी मार्च अखेर खर्च व्हावा, तसेच ज्या विभागांना अतिरिक्त निधीची गरज आहे त्यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे नगरविकास परिवहन राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी सांगितले. (Challenge of spending funds of Rs 457 crore)

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृह येथे झाली. बैठकीपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी यांनी विषयसूचीचे वाचन केले. मागील बैठकीतील विषयांच्या अनुपालनाचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला व त्यावर सविस्तर चर्चा झाली. (Challenge of spending funds of Rs 457 crore)

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ६४२ कोटींपैकी २२९ कोटी, तर विशेष घटक योजनेतील १२० कोटींपैकी ७७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. पुढील सन २०२६-२७ आर्थिक वर्षासाठी ५५४ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करत एकूण १०९३ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असून यासंदर्भात उद्या मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी मंदिर विकास आराखडे, शाहू स्मारक तसेच केएमसी बसेससाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत जिल्ह्यात सहा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास समितीने मंजुरी दिली. यामध्ये निलेवाडी (हातकणंगले), टाकळीवाडी व संभाजीपूर (शिरोळ), कांडगाव (करवीर), बेलेवाडी काळम्मा (कागल) आणि मळगे बु. (कागल) या ठिकाणांचा समावेश आहे. तसेच 'क' वर्ग तीर्थक्षेत्रांमध्ये नव्याने सहा यात्रास्थळांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये हालसिद्धनाथ मंदिर इस्पूर्ली, राम मंदिर वळीवडे, केदारलिंग मंदिर कडगाव, महादेव मंदिर देवर्डे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर शिंदेवाडी मा., मल्लनाथ मंदिर कानूर खुर्द तसेच मुरिसिद्धेश्वर बिरदेव मंदिर हसुर चप्पू या ठिकाणांचा समावेश आहे. (Challenge of spending funds of Rs 457 crore)

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ साठीच्या प्रारूप आराखड्यात प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, शासनाकडून प्राप्त १५० दिवसांच्या आराखड्यांतर्गत कार्यालयीन इमारतींचे नूतनीकरण, सर्वंकष आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण, पोलीस यंत्रणेसाठी पायाभूत सुविधा, साकव बांधकाम, जिल्हा व ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण, पूर नियंत्रण, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान तसेच क्रीडा विभागाच्या योजनांचा समावेश आहे. यासाठी राज्यस्तरीय बैठकीत ४१०.०१ कोटी इतक्या अतिरिक्त मागणीस सभागृहाने मान्यता दिली.

बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, अमल महाडीक, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, उपायुक्त (नियोजन) संजय मरकळे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. (Challenge of spending funds of Rs 457 crore)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman