Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आळशी काँग्रेस आणि कॉक्रोच

आळशी काँग्रेस आणि कॉक्रोच

काँग्रेस म्हणजे टी-२० सामन्यातील असा फलंदाज, जो पहिल्या पाच चेंडूंवर एकही धाव घेत नाही आणि सहाव्या चेंडूवर फक्त एक धाव काढतो - म्हणजे स्वतः जिंकणार नाही आणि इतरांनाही जिंकू देणार नाही.

(Lazy Congress and Cockroaches)

  • राकेश कायस्थ

देशाच्या लोकशाही व्यवस्थेला पहिला मोठा धोका १९७५ च्या आणीबाणीच्या काळात निर्माण झाला होता. त्यावेळी जनसंघ ही आधीपासून अस्तित्वात असलेली आणि संघटित राजकीय शक्ती होती. काँग्रेसविरोधात लढण्यासाठी जनसंघाने जुनी काँग्रेस, समाजवादी आणि इतर पक्षांसोबत स्वतःचे विलिनीकरण केले. वैचारिक समानता नसतानाही तत्कालीन राजकीय गरज म्हणून जनता पक्षाची निर्मिती झाली.

१९८९ पर्यंत राजीव गांधी यांचे सरकार चांगले चालले होते. १९८० मध्ये गांधीवादी समाजवादाचा दावा करत स्थापन झालेला भारतीय जनता पक्ष सुरुवातीच्या अपयशानंतर स्पष्टपणे धार्मिक राजकारणाच्या मार्गावर गेला होता. बोफोर्स प्रकरण बाहेर आल्यानंतर भाजपने पुन्हा समाजवाद्यांशी हातमिळवणी केली. (Lazy Congress and Cockroaches)

व्ही. पी. सिंग यांच्या सरकारला एका बाजूला कट्टर धार्मिक भाजपचा तर दुसऱ्या बाजूला डाव्या पक्षांचा पाठिंबा होता, तो केवळ काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी. त्या काळात काश्मीर खोऱ्यातून पंडितांचे विस्थापन झाले; मात्र या लेखाचा मुद्दा तो नाही.

काँग्रेस काही शिकत का नाही?

मुख्य प्रश्न असा आहे की, देशातील सर्वात जुना आणि ऐतिहासिक अनुभव असलेला पक्ष असूनही काँग्रेस पक्ष स्वतःविरोधात तयार झालेल्या अशा व्यापक आघाड्यांकडून काही शिकला का? (Lazy Congress and Cockroaches)

जर काँग्रेसविरोधात वैचारिक मतभेद बाजूला ठेवून विविध पक्ष एकत्र येऊ शकत होते, तर भाजपविरोधात काँग्रेसने तशाच प्रकारची आक्रमक आणि व्यापक विरोधी एकजूट उभी करण्याचा गंभीर प्रयत्न का केला नाही? (Lazy Congress and Cockroaches)

राहुल गांधी यांनी २०१९ च्या निवडणुकांपूर्वी अनेकदा इशारा दिला होता की, भाजप पुन्हा सत्तेत आला तर भविष्यात देशात निवडणुका केवळ औपचारिक राहतील. त्यांचा अंदाज पूर्णपणे चुकीचा नव्हता; देश ज्या दिशेने जात आहे, त्यातून त्या भीतीची छाया दिसते.

मात्र प्रश्न असा आहे की, हे सगळे समजत असूनही काँग्रेसने काय केले?

काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या सर्व पक्षांना पुन्हा एकत्र आणण्याचा, व्यापक विरोधी आघाडी उभा करण्याचा प्रयत्न जर काँग्रेसने केला असता, तर आजचे राजकीय चित्र वेगळे असू शकले असते. (Lazy Congress and Cockroaches)

राहुल गांधी यांचा वैयक्तिक प्रामाणिकपणा, त्यांचा संघर्ष आणि सातत्याने सत्तेला प्रश्न विचारण्याची त्यांची तयारी यामुळे काँग्रेसबाबत विचारले जाणारे मूलभूत प्रश्न अनेकदा झाकोळले जातात.

देशातील सर्वात जुना पक्ष असूनही संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी तुमच्याकडे ठोस आराखडा का नाही? रस्त्यावरचा संघर्ष, सातत्यपूर्ण आंदोलन, व्यापक संघटनबांधणी आणि धोरणात्मक राजकीय समझोते का दिसत नाहीत? (Lazy Congress and Cockroaches)

कॉर्पोरेट पाठबळ असलेला फॅसिस्ट प्रवाह हे भारतीय राजकारणाचे जितके मोठे वास्तव आहे, तितकेच मोठे वास्तव म्हणजे काँग्रेसची निष्क्रियता आणि संघटनात्मक अपयश.

बंद गिरणीसारखी अवस्था

माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो : मुंबईतील माझ्या कार्यालयाच्या शेजारी प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यालय आहे. उत्सुकतेपोटी मी एकदा आत गेलो असता, तिथले दृश्य बंद पडलेल्या जुन्या गिरणीसारखे वाटले. तुरळक लोक दिसले आणि त्यातील बहुतेक पन्नाशीपुढील होते.

देशातील बहुतेक राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती यापेक्षा वेगळी असेल असे मला वाटत नाही. (Lazy Congress and Cockroaches)

राहुल गांधी संविधान हातात घेऊन सभा घेत आहेत; पण इतर काँग्रेस नेते तितक्याच तीव्रतेने रस्त्यावर उतरलेले दिसत नाहीत. दुसरीकडे भाजपमध्ये एखाद्या नेत्यावर संकट आले की लाखो कार्यकर्ते 'मैं भी चौकीदार'चे टी-शर्ट घालून रस्त्यावर उतरतात.

राजकीय परिवर्तन केवळ एका नेत्याच्या प्रतिमेमुळे किंवा भाषणांमुळे होत नाही. त्यामागे संघटनशक्ती असते.

काँग्रेस जवळपास "संघटनशून्य" पक्ष बनला आहे. दुसरी, तिसरी आणि चौथी नेतृत्वफळी जवळपास नाहीशी झाली आहे.

याउलट समाजवादी पक्षासारख्या प्रादेशिक पक्षांची परिस्थिती अधिक मजबूत दिसते. प्रत्येक जिल्ह्यात असे काही नेते सापडतात ज्यांना स्थानिक जनता ओळखते.

स्वतःही जिंकणार नाही…

काँग्रेस स्वतःच्या अंतर्गत संघर्षांनाही सांभाळू शकत नाही. कर्नाटकमध्ये डी. के. शिवकुमार यांनी अद्याप पक्ष सोडलेला नाही, कारण ते गांधी कुटुंबाशी जुने निष्ठावान मानले जातात. सचिन पायलट यांच्याकडे पुरेसे आमदार असते, तर राजस्थानात आज स्वतंत्र प्रादेशिक पक्ष उभा राहिला असता आणि काँग्रेसची मते विभागत असता. (Lazy Congress and Cockroaches)

काँग्रेस म्हणजे टी-२० सामन्यातील असा फलंदाज, जो पहिल्या पाच चेंडूंवर एकही धाव घेत नाही आणि सहाव्या चेंडूवर फक्त एक धाव काढतो - म्हणजे स्वतः जिंकणार नाही आणि इतरांनाही जिंकू देणार नाही.

राहुल गांधी हे विरोधी राजकारणातील सर्वात मोठा चेहरा आहेत आणि निर्भयतेचे प्रतीकही आहेत; पण भाजपसारख्या साम, दाम, दंड, भेद या सर्व साधनांनी सज्ज पक्षाविरोधात केवळ एवढे पुरेसे आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

अरविंद केजरीवाल अडचणीत आले नसते आणि यांची प्रतिमा धुळीस मिळाली नसती, तर आज तेच विरोधी राजकारणाचा सर्वात मोठा चेहरा असते.

देश वारंवार काँग्रेसकडून निराश होतो, पण पर्याय नसल्याने पुन्हा तिच्याकडेच पाहतो. सोशल मीडियावर दिसणारा तथाकथित 'कॉक्रोच पार्टी'बद्दलचा उत्साहही देशातील बदलाची तीव्र बेचैनी आणि पर्याय शोधण्याची धडपड दर्शवतो.

राहुल गांधींच्या राजकीय भविष्यवाण्या कितीही अचूक असल्या, तरी काँग्रेसमध्ये संघटनात्मक परिवर्तन घडवून आणता आले नाही आणि व्यापक विरोधी एकता मजबूत करून सामूहिक लढाई उभारता आली नाही, तर त्या भविष्यवाण्यांचा देशाला काहीही उपयोग होणार नाही.

(राकेश कायस्थ हे हिंदीतील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman