चेन्नई : तामिळनाडू राज्यात केवळ दलित असल्यामुळे महिला सरपंचाला अनेक प्रकारे मानहानीला सामोरे जावे लागले आहे. त्यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिका-यांकडे धाव घेतली असून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी महिला सरपंचांनी केली आहे.
(Dalit woman Sarpanch's struggle for a chair in Tamil Nadu)
कोडुंगल गावच्या सरपंच मलरविझींचा संघर्ष
तमिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील कोडुंगल गावच्या सरपंच मलरविझी यांच्या संघर्षाची ही कहाणी आहे. सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर जवळपास साडेचार वर्षे त्यांना पंचायत कामकाजात सहभागी होण्यापासून रोखण्यात आले. या वागणुकीमुळे व्यथित झालेल्या मलरविझी यांनी विल्लुपुरम जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखले.
पंचायत कामकाजापासून दूऱ् ठेवले
मलरविझी २०२१ मध्ये सरपंच म्हणून निवडून आल्या. त्याच्या पतीशी परिचित असलेल्या स्थानिक डीएमके पदाधिकाऱ्यानं त्यांना निवडणूक लढवण्यासाठी तयार केलं होतं. सुरुवातीला त्या निवडणूक लढवण्यास तयार नव्हत्या परंतु आग्रह झाल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली. परंतु भविष्यात आपल्याला कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, याची कल्पना त्यांना नव्हती. त्यांना पंचायत कामकाजापासून दूर ठेवण्यात आले आणि पंचायतमधील सार्वजनिक कामांवर इतरांनी नियंत्रण मिळवले. धनादेशावर स्वाक्षरी करण्याचा अधिकारही मिळाला नाही, असा त्यांचा आरोप आहे. (Dalit woman Sarpanch's struggle for a chair in Tamil Nadu)
तब्बल साडेचार वर्षांनी कार्यालयाच्या चाव्या मिळाल्या, राष्ट्रीय ध्वज फडकावला.
मलरविझी यांनी तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर तब्बल साडेचार वर्षांनी त्यांना सरपंचांच्या खुर्चीवर बसण्याची परवानगी देण्यात आली, कार्यालयाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आणि त्यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवला. मात्र, धनादेशांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार आणि पंचायतमध्ये प्रस्ताव मंजूर करून घेण्याची मागणी अद्यापही प्रलंबित होती. उपसरपंच आणि तिचा भाऊ आपल्या कामकाजात अडथळे आणत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
दहा लाखांहून अधिक कमिशन देण्यासाठी मलरविझीवर दबाव
मलरविझी जेव्हा जेव्हा आपल्या अधिकारांचा वापर करण्याचा प्रयत्न करायच्या, तेव्हा त्यांना अविश्वास प्रस्ताव आणून पदावरून हटवण्याची धमकी दिली जात होती. तक्रारींवर कारवाई करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी कथित आरोपींशी जुळवून घेण्याचा सल्ला मलरविझी यांना दिला, असा त्यांचा आरोप आहे. मनरेगा अंतर्गत कामांसाठी दहा लाख रुपयांहून अधिक कमिशन देण्याबाबतही त्यांच्यावर दबाव आणण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे. जिल्हाधिका-यांना दिलेल्या तक्रार अर्जात त्यांनी पंचायत अध्यक्ष म्हणून आपले अधिकार पुनर्स्थापित करण्याची, पूर्ण झालेल्या कामांची देयके जारी करण्याची आणि भेदभाव, धमक्या व हस्तक्षेप केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (Dalit woman Sarpanch's struggle for a chair in Tamil Nadu)

