Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गुंडांच्या गल्लीतला सांस्कृतिक धक्का

गुंडांच्या गल्लीतला सांस्कृतिक धक्का

  • राकेश कायस्थ

गुंडांच्या गल्लीतला सांस्कृतिक धक्का अजून ओसरलेला नाही. उलट, तो वेगाने पसरत चालला आहे. हा धक्का नेमका कसा दिला जातो, याचे उदाहरण भारतातील अगदी सर्वसामान्य दिसणाऱ्या मुलींनी घालून दिले आहे.

एकटी मुलगी गुंडांच्या गल्लीत शिरते. तिला पाहून एखादा मवाली शेरेबाजी करतो. पूर्वीसारखी मान खाली घालून ती पुढे निघून जात नाही. उलट, त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून पाहते. हा पहिला धक्का!

गुंड तरीही हसतो. आपले पुढचे हत्यार बाहेर काढतो. मुलीच्या शरीराला आणि लैंगिक अवयवांना लक्ष्य करून अशी घाणेरडी शेरेबाजी करतो की तिने लाजेने मान खाली घालावी. पण घडते नेमके उलटे. मुलगी त्याच्याकडे अशा नजरेने पाहते जणू, हे सगळे मला का सांगतो आहेस? असं विचारतेय. जैविकदृष्ट्या मी जशी आहे, तशीच तुझी आई, बहीण किंवा घरातील अन्य स्त्रीही आहे. पण तू काय आहेस?

तुझी जीभ पूर्णपणे सडली आहे. तिच्यातून थेंबाथेंबाने पू वाहतो आहे. हा रोग असाध्य आहे आणि त्याच्यासोबत जगण्याचा शाप तुला मिळाला आहे. या दुर्गंधीत तुला रात्री झोप तरी कशी लागते? एकटा असताना तुला आत्महत्या करावी, असे कधी वाटत नाही?

मामू, आता सवय करून घे!

मनातल्या कुंठेच्या पुवात आकंठ बुडालेले गुंड! पण गुंड शेवटी गुंडच असतात. ते इतक्या सहजासहजी शस्त्रे खाली ठेवतील, तर ही गुंडांची गल्ली फोफावणार कशी? वर्दीतील साथीदारांची ताकद आणि काळे कोट घातलेल्या आंधळ्या न्यायाधीशांची साथ मिळाल्यावर गुंड आपला अखेरचा डाव खेळतो. गर्दीत अडकलेल्या एखाद्या मुलीच्या लैंगिक अवयवांपर्यंत हात नेण्याची हिंमत करतो. त्याच्या बदल्यात मुलगी त्याच्या गुप्तांगावर जोरदार लाथ घालते.

लाथ बसते गल्लीतल्या एखाद्या सामान्य गुंडाला; पण वेदना त्या गुंडशिरोमणींना! आपला खास अवयव धरून गुंडशिरोमणी सांगू लागतात की, आयुष्यात असा सांस्कृतिक धक्का यापूर्वी कधीच बसला नव्हता. अशा वेळी `मुन्नाभाई एमबीबीएस`मधील संवाद आठवतो : "आयुष्यात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडतात, मामू. आता त्याची सवय करून घे!"

हत्यार मुलींनी हिसकावून घेतले आहे

गुंडशिरोमणींचे हे सांस्कृतिक विमर्शाचे तत्त्वज्ञान आपल्या आकलनात नवे पदर उलगडते. पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे गुंडांच्या साम्राज्यात संस्कृतीचा निवास शरीराच्या नेमक्या कोणत्या भागात असतो! दुसरी, आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या हत्याराने आपण इतरांना जखमी करत आलो, त्याच हत्याराने कुणीतरी आपल्यालाही जखमी कसे करू शकते, याचे त्यांना वाटणारे आश्चर्य.

जगातील सर्वांत घाणेरड्या शिव्या देणाऱ्या आणि हिंसेलाच आपले हत्यार मानणाऱ्या गुंडांना गुंडशिरोमणी नियमितपणे एक्सवर फॉलो करतात. तेव्हा मात्र त्यांना कधी सांस्कृतिक धक्का बसत नाही!

जम्बुद्वीपात घडणारा बदल डोळे उघडे ठेवून पाहण्यासारखा आहे. असे बदल शेकडो नव्हे, तर हजारो वर्षांनंतर घडतात. मुलींविरुद्ध आजवर वापरले गेलेले हत्यार मुलींनी हिसकावून घेतले आहे आणि त्याच हत्याराने त्या प्रतिहल्ला करू लागल्या आहेत.

याहूनही मोठी गोष्ट म्हणजे, नव्या काळातील मुलींना हे समजले आहे की, कोणतीही शिवी दिली, तरी तिचे लक्ष्य अखेरीस स्त्रीच असते. त्यामुळे त्यांनी एक नवे तंत्र विकसित केले आहे.

मुलींनी पुकारलेले बंड

गुंडशिरोमणींना दिलेल्या शिव्यांचे विश्लेषण केले, तर लक्षात येते की या शिव्या त्यांच्या पुरुषत्वाचा फुगा फोडणाऱ्या आहेत. त्यांपैकी बहुतांश शिव्या त्यांच्या शरीरावर आणि लैंगिकतेवर केंद्रित आहेत. हा स्वतःमध्येच एक गेमचेंजर बदल आहे.

'पॅट्रिआर्की' हा जडजंबाळ इंग्रजी शब्द आहे आणि 'पितृसत्ता' ही संकल्पनाही सामान्य माणसाला तितकीच अवघड वाटू शकते. सोप्या भाषेत सांगायचे, तर या देशातील मुलींनी त्यांच्या मानसिक जडणघडणीविरुद्ध बंड पुकारले आहे. कुटुंबापासून देशापर्यंत सत्तेच्या रचनेच्या सर्वोच्च स्थानी बसलेला माणूस कितीही मूर्ख असला, तरी त्याला प्रश्न विचारायचे नाहीत; फक्त त्याच्या आज्ञा पाळायच्या, अशी शिकवण त्यांना दिली जाते. मुली आता या शिकवणीविरुद्ध उभ्या राहत आहेत.

या बंडाला किरकोळ समजू नका. लैंगिकतेचा आधार घेऊन सुशिक्षित आणि उच्च नैतिक मूल्ये जपणाऱ्या मुलींना गप्प करता येईल, असा गल्लीतील गुंडांचा आजवर समज होता. पण या देशातील मुलींनी लैंगिकतेशी संबंधित निषिद्ध कल्पना जणू रातोरात जुन्या कपड्यांसारख्या फेकून दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी कुणी त्यांच्या शरीराच्या कोणत्या भागाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, हे सांगताना आता त्यांना लाज वाटत नाही.

गुंडांची व्यवस्था निःशस्त्र

या बदलामुळे गुंडांची व्यवस्था निःशस्त्र झाली आहे. ती आधीपासूनच उघडी-नागडी होती.

काळे कोट घातलेल्या आंधळ्या न्यायाधीशांच्या आणि आपली वर्दी विकून टाकलेल्या रक्षकांच्या आश्रयाने उन्मत्त झालेल्या गुंडांनी आता स्वतःची काळजी करावी. सामाजिक व्यवहाराचा गंभीर अभ्यासक म्हणून मी ही गोष्ट पूर्ण जबाबदारीने सांगत आहे. तुम्ही फक्त सहा महिने वाट पाहा. आज गर्दीत मुलींच्या स्तनांपर्यंत पोहोचणाऱ्या हातांची नखे एकेक करून भरबाजारात उपटली जातील.

देशातील सर्वांत मोठ्या राज्याच्या गुंडांच्या मुखियाच्या बाजूने उभा असलेला एक भाडोत्री मुसलमान न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या या देशाची कन्या नेहा बोरा हिला 'मादा' म्हणतो आहे. आणि उच्चवर्णीय हिंदू अस्मितेचे ठेकेदार त्यावर टाळ्या वाजवत आहेत. यावरून या लोकांची मने किती सडली आहेत, याचा अंदाज घ्या.

एखाद्या स्त्रीला 'मादा' म्हणणाऱ्याच्या पुरुषत्वाची लक्षणेही भरबाजारात पुसून टाकली जातील, याबद्दल शंका बाळगू नका. अर्ध्या लोकसंख्येच्या मनात शतकानुशतके खदखदणारा संताप आता ज्वालामुखी बनून फुटण्याच्या बेतात आहे.

फक्त बघत राहा!

(राकेश कायस्थ हे हिंदीतील ख्यातनाम लेखक आणि पत्रकार आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman