Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कन्येच्या वाढदिनी तृतीयपंथीयांचा सन्मान

कन्येच्या वाढदिनी तृतीयपंथीयांचा सन्मान

कोल्हापूर : प्रतिनिधी : तृतीयपंथीयांच्या उपस्थितीत कन्येचा पाचवा वाढदिवस साजरा करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम जगताप कुटुंबियांनी केला. तृतीयपंथीयांची ओटी भरत त्यांचा अपघाती विमा काढण्यात आला.

राहूल जगताप यांच्या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

राहूल जगताप यांनी सामाजिक उत्तरदायित्व जपत त्यांची कन्या राजेश्वरी जगताप हिचा पाचवा वाढदिवस तृतीयपंथीयांच्या सन्मानपूर्वक उपस्थितीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. या उपक्रमाने समाजात समता, सन्मान आणि सामाजिक सुरक्षिततेचा प्रेरणादायी संदेश दिला. (Birthday celebration in the presence of transgender individuals)

तृतीयपंथीयांसाठी पाच लाखाचा अपघाती विमा

कार्यक्रमात राजेश्वरीचे आई-वडील राहुल जगताप आणि राधिका जगताप यांनी उपस्थित तृतीयपंथीयांचे साडी, ओटी व आहेर देऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत व सत्कार केला. याप्रसंगी राजेश्वरीचे आजोबा एस. बी. जगताप व एस. जी. पाटील यांनी महत्त्वपूर्ण सामाजिक संकल्प जाहीर केला. कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संबंधित तृतीयपंथी तसेच कोल्हापूरमध्ये कार्यरत तृतीयपंथीयांपैकी प्रत्येकासाठी भारतीय डाक विभागाच्या अपघात विमा योजनेअंतर्गत प्रत्येकी पाच लाखांचा अपघात विमा काढून देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या योजनेसाठी लागणारा संपूर्ण खर्च कुटुंबाकडून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि सामाजिक परिवर्तनासाठी योगदान देण्याची संधी आहे,” अशी भावना यावेळी जगताप व पाटील परिवाराने व्यक्त केली.

समाजातील वंचित घटकांना सन्मान, सुरक्षितता आणि मुख्य प्रवाहात स्थान मिळावे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. (Birthday celebration in the presence of transgender individuals)

या सामाजिक उपक्रमास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख डॉ.श्रीराम साळुंखे, जिल्हा आपत्ती प्रमुख प्रमोद संकपाळ, अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय कार्यवाह प्रा.अशोक पाटील, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही.एम.पाटील, प्रिन्स शिवाजी बोर्डींगचे उदय पाटील, डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटलचे समन्वयक अजित पाटील, अमर पाटील, प्रदीप पवार, पोलिस कर्मचारी देवस्थान कर्मचारी वृंद मित्र परिवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अशोक पाटील यांनी केले. मंगल आळवेकर यांनी आभार मानले. (Birthday celebration in the presence of transgender individuals)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman