एकेक दिवस आठवत राहतो..आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर एखादा दिवस पुन्हा पुन्हा आठवत राहतो. आज 'तो' दिवस पुन्हा आठवतो आहे.' तू कधीच आमच्या सोबत देवाचं काही केलं नाहीस. आता आमचे थोडेच दिवस राहिलेत.
आमचा काही भरोसा नाही. आमच्या बरोबर चल देवाचं करून येऊ.. ” काही वर्षांपूर्वी आई-वडिलांनी ठरवून मला एके दिवशी गाठला होता आणि अचानक आई बोलायला लागली होती.” नाही.. मी तुमच्यासोबत येणार नाही.. कुठे कुठे जायचय ते सांगा मी एकटा जाऊन येतो. मला हे सगळं आवडत नाही हे तुम्हाला माहित आहे. पण आता तुम्ही म्हणताय तर तुमच्यासाठी मी हे करीन. कधी जायचं ते बोला. ” मी आई-वडिलांना बोललो होतो आणि त्यांनी सांगितलेल्या दिवशी निघालो होतो. एकटाच. (The film 'Gondhal' is headed for the Oscars)
किशोर कदम
मी नगर जिल्ह्यातला. संगमनेर तालुक्यातलं तळेगाव दिघे हे माझं गाव. तसा मी लहानाचा मोठा मुंबईत समुद्रकिनारी झालेला. गावी अधून मधूनच जाणारा. त्यामुळे नंतर नंतर फार कमी कमी वेळा गावी जाणं झालेलं. पुढे मराठी साहित्यातली गावोगावची माती आणि माणसं आयुष्यात आली. बनगरवाडी, माणदेशी माणसं, वावटळ, कोसला, गोतावळा, फकीरा, झोंबी श्रीनांच्या कादंबऱ्या जसजशा वाचनात आल्या तसतशी गावच ओढ धुळी सारखी हळूहळू मनामध्ये उडायला लागली.पण शहराच्या गर्दीत गावच्या धुळीची ती वावटळओढ उडत उडत हायवेज वरून कुठेतरी निघून गेली.
मी आस्तिक नाही तसंच मी नास्तिकही नाही. माझा त्या अनामिक उर्जेवर विश्वास आहे जी अचानक जाणवते. कधी एखादं पुस्तक वाचताना, कधी एखादा सिनेमा पाहातांना,कधी एखादी कविता, एखाद्या गझल मधून गुलाम अली, मेहंदी हसन,जगजीत सिंग ऐकताना, कधी एखाद्या व्यक्तीसोबत असताना, कधी एखाद्या जागी पोचल्यावर, तर कधी एकटेपणाच्या काळोखात काजव्यासारखी चकाकत माझ्यावर बरसलेली ती ऊर्जा. ती ऊर्जा,ती एनर्जी सगळीकडे पसरलेली असते.आपल्यातला कुठलातरी अँटेना कधीतरी आपल्या नकळत ती कॅच करतो, आणि काहीतरी होतं. मला वाटतं देव तोच असतो.
आई-वडलांच्या सांगण्यानुसार मी निघालो होतो. एकटाच. आमच्या सगळ्या देवांना भेटायला. मला आठवतंय तुळजापूरच्या तुळजाई पासून सुरुवात करून देव देव करत मी त्र्यंबकेश्वर, वाकडीचा खंडोबा करत करत अखेर मी गाठला होता आमच्या गावच्या वेशिवरला बिरोबा. या सगळ्यांना भेटून शेवटी मी पोहोचलो होतो श्रीरामपूरच्या सुमतीबाई लांडे यांच्या घरी. रंगनाथ पठारे सरही तिकडे आलेले होते. दिवसभर गप्पा टप्पा जेवणं वगैरे झाली आणि मी गावी जायला निघालो कारण गावी आमच्या वाड्यात खास मी येणार म्हणून चुलत्यांनी पूजा घातली होती. रात्री जागरण गोंधळ होता. सुमतीबाई आणि पठारे सर म्हणाले “आम्हीही तुझ्या सोबत येतो” ते येणार म्हटल्यावर माझा उत्साह अजूनच वाढला. आम्ही तिघेही गावी पोहोचलो. पोहोचायला संध्याकाळ झाली होती.सगळ्यांच्या ओळखीपाळखी चहापाणी झालं.रात्रीची जेवणं आटोपली. वाड्याच्या अंगणात मधोमध देव मांडले गेले. दिवट्या पेटवल्या गेल्या. संबळ, तुणतुणं,झांजा, घुंगरू, हलग्यांसोबत वाघ्या मुरळी आले. देवीचे टाक, कलश, विड्याची पानं, सुपाऱ्या, हळद कुंकू, धूप उदबत्त्या, भंडारा सगळं सगळं मांडलं गेलं आणि “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या आरोळीने गोंधळ सुरू झाला.वाघ्या मुरळी नाचायला लागले.सुमती बाई आणि पठारे सर माझ्या अगदी समोरच्या उंच टेकडावर,दूरवर बसून रात्रभर दिवटीमध्ये तेल टाकणाऱ्या मला पाहत होते. वाघ्या मुरळी आणि त्यांच्या सोबतचे वाजंत्री यांनी दिवट्या बुधल्याच्या त्या लालसर केशरी सोनेरी प्रकाशात गाऱ्हाणं मांडलं. देवाला जागरणाला येण्याचं आवतान दिलं. रात्र जसजशी गडद होत गेली तस तशी आजूबाजूची गर्दी वाढत गेली. (The film 'Gondhal' is headed for the Oscars)
वडील ज्या गावात लहानाचे मोठे झाले, ज्या अंगणात खेळले, बागडले, ज्या लोकांमध्ये त्यांनी तारुण्याचा येळकोट केला, ते सगळे चेहरे मला आजूबाजूला दिसत होते, याच्यातला कुठला चेहेरा वडिलां सोबत एखाद्या नदीमध्ये उतरला असेल..? याच्यातला कुठला चेहरा वडलांना आवडलेल्या एखाद्या मुलीसाठी त्यांच्यासोबत गेला असेल…? यांच्यातल्या कुठल्या
चेहऱ्याला वडिलांनी आपली स्वप्न सांगितली असतील..? सगळे चेहरे मला आसपास दिसत होते. दिवट्या बुधल्यांच्या त्या लालसर केशरी सोनेरी हलत्या प्रकाशात चमचमणारे अनेक डोळे माझाकडे पाहत होते. मी दिवटीमध्ये मध्ये तेल टाकता टाकता चारी दिशांना पाहत होतो. आयाबाया,आज्याकाक्या, चुलतेमालते, मित्रगोत्र, नातेवाईक पातेवाईक, गावच्या गर्दीत बसून माझ्याकडे पाहात वाघ्या मुरळीन मांडलेलं आख्यान ऐकत होते. हसत होते, रडत होते, गंभीर – निर्विकार, उत्सुक- कंटाळलेले, तांबारलेले- झोपाळलेले असे कितीतरी चेहरे वाघ्या मुरळी सोबत देवाला जागवत बसले होते.
मधल्या दिवटीत मी रात्रभर तेल घालत होतो. तेल संपत होतं,आतून आणून भरलं जात होतं. चारी बाजूंना अंगणातल्या दिवट्या बुद्धल्यां धगधगत होत्या. आक्खा वाडा त्या प्रकाशात सावलीसारखा हलताना दिसत होता. रात्र गडद होताना हलग्या, तुणतुणी,झांजा, घुंगरू एकमेकात मिसळून झिन्गत होती, ती झिन्ग चढत जात होती… मी तेल घालत असलेल्या दिवटीचा प्रकाश आणखी केशरीसोनेरी होत त्याचा परिघ हळूहळू वाढवत जात होता..
तो परीघ आज वाढत वाढत ऑस्कर पर्यंत पोहोचलाय.. मी अजूनही दिवटीत तेल घालतोच आहे…. आणि… मला गोंधळी गातांना ऐकू येतोय…. येळकोट बोला रे बोला देवाच्या भेटी चला… देवाच्या भेटी चला येळकोट बोला रे बोला.. (The film 'Gondhal' is headed for the Oscars)

