Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत ज्ञान देणे आवश्यक :  आनंदराव पाटील

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत ज्ञान देणे आवश्यक : आनंदराव पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : विकसित भारत घडविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारीत ज्ञान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारत सरकार मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी आज येथे केले.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये वाढवण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्राला थेट उद्योगांशी जोडण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, विद्यापीठ उद्योग कक्ष आणि बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना नॅटस् उद्योग-शिक्षण परिषदेचे आयोजन विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजनीश कामत होते. (Lecture by Anandrao Patil)

विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग देणे आवश्यक

भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे आनंदराव पाटील पुढे बोलताना म्हणाले, नॅटस्च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. उद्योग व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण झालेली पोकळी कमी करण्याचे काम नॅटस्च्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यावेतन दिले जाते, याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. एनएसडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठामध्ये कौशल्य विकास केंद्र उभे करण्यासाठी विद्यापीठाने आवश्यक तो प्रस्ताव द्यावा. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे कौशल्य अवगत करून घेतले पाहिजे. उद्योग व्यवसायाकडे आकृष्ट होण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. (Lecture by Anandrao Patil)

आनंदराव पाटील म्हणाले, सध्या २५ कोटी विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत. विविध तांत्रिक कौशल्यांच्या मध्यमातून त्यांना त़ंत्रज्ञानामध्ये आणणे आवश्यक आहे. याकरिता शिक्षणक्षेत्राने पुढाकार घ्यावा. आजचे विद्यार्थी देशाचे भविष्य घडविणारे आहेत, त्यांना अर्थपूर्ण कौशल्ये प्राप्त करून दिले पाहिजेत. आत्मनिर्भर पिढी निर्माण करण्यासाठी हे घडवणे आवश्यक आहे. शिक्षकांबरोबर समाज म्हणून आपण सर्वांनी हे केले पाहिजे.

नोकरीसाठी पदवीधर विद्यार्थी निर्माण करणे शक्य

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ.राजनीश कामत म्हणाले, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हयांमध्ये नॅटस्ची प्रभावी अंमलबजावणी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करीत आहे. कालच प्रधानमंत्री रोजगार योजनेचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. आपणांस ऑन जॉब ट्रेनिंग मोठया प्रमाणात सुरू करावयाचे आहे. एआय डाटाविषयक नैपुण्य आणि सायबर सुरक्षा महत्वाची आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञान आणि उपयोजित विज्ञान जोपासण्याविषयी शिकविणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान अधिविभागामध्ये रोबोटिक्सचा समावेश करावयाचा आहे. या परिषदेच्या माध्यमातून नोकरीसाठी सज्ज असे पदवीधर विद्यार्थी निर्माण करणे शक्य होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांनी केले, तर विद्यापीठ उद्योग कक्षाचे संचालक डॉ.सागर डेळेकर यांनी आभार मानले. यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.प्रकाश बच्छाव यांचेसह उद्योग व्यवसायाशी संबंधीत मान्यवर, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, उद्योग व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधीत साडेपाचेशहून अधिक सदस्य सहभागी झाले होते. (Lecture by Anandrao Patil)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman