Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
युवकांनी समर्पण,त्याग, कर्तव्यभावनेतून भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे : अजित डोवाल

युवकांनी समर्पण,त्याग, कर्तव्यभावनेतून भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे : अजित डोवाल

Maharashtra Dinman 3 weeks ago

पुणे : प्रतिनिधी : स्वातंत्र्य ही सहज मिळालेली देणगी नसून असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून प्राप्त झालेली अमूल्य संपत्ती आहे. लोकमान्य टिळकांनी दिलेला 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' हा संदेश आजच्या काळात विकसित भारताच्या राष्ट्रीय संकल्पात रूपांतरित करण्याची गरज आहे.

राष्ट्रहित हे सर्वांत सर्वोच्च मानून प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे. युवकांनी लोकमान्य टिळकांचे विचार आणि ‘गीतारहस्य’चा अभ्यास करून समर्पण, त्याग आणि कर्तव्यभावनेने विकसित भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणिती टिळक यावेळी उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लोकमान्य टिळकांचे राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, समाजजागृती आणि विचारप्रबोधनाचे कार्य आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे सांगितले. हा पुरस्कार स्वीकारणे हा आपल्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी विकसित, आत्मनिर्भर आणि शक्तिशाली भारताच्या निर्मितीसाठी लोकमान्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. (Ajit Doval conferred with the Tilak Award)

अजित डोवाल यांनी राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केला

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करतांना अमित शाह म्हणाले, देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेला बळकटी देण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. गुप्तचर यंत्रणेत अनेक आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि निर्णायक बनविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक धोरणात्मक निर्णयांच्या अंमलबजावणीत त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड अत्यंत योग्य असून त्यांच्या कार्यातून देशातील तरुणांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला. (Ajit Doval conferred with the Tilak Award)

राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी अजित डोवाल यांची झालेली निवड ही राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव आहे. २०१४ पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे परिमाण दिले. त्यांच्या ‘प्रोॲक्टिव्ह डिटरन्स’ च्या संकल्पनेमुळे भारताची सुरक्षा रणनीती अधिक प्रभावी झाली आहे. भारत आता केवळ हल्ले सहन करणारा देश नसून आवश्यकतेनुसार ठोस प्रत्युत्तर देण्याची क्षमता असलेले सामर्थ्यवान राष्ट्र बनल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्सेवेला वाहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमान्य टिळकांनी दिलेला स्वराज्याचा विचार आज राष्ट्रीय सुरक्षेच्या बळकटीत अधिक प्रभावीपणे प्रतिबिंबित होत असल्याचे सांगितले. देशाच्या सीमा, अंतर्गत सुरक्षा आणि गुप्तचर व्यवस्थेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यात अजित डोवाल यांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांना मिळालेला पुरस्कार देशाच्या सुरक्षा यंत्रणा, सशस्त्र दल आणि राष्ट्रसेवेला वाहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान असल्याचे श्री. शिंदे म्हणाले.

डोवालांच्या योगदानाने दहशतवादविरोधी यंत्रणा सक्षम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली असून गृहमंत्री अमित शाह आणि अजित डोवाल यांच्या योगदानामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा, सीमासुरक्षा आणि दहशतवादविरोधी यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. भारतीय पोलीस सेवा, गुप्तचर व्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून विविध आव्हानात्मक परिस्थितीत प्रभावी नेतृत्व करत अजित डोवाल यांनी राष्ट्रसेवेत दिलेले योगदान देशासाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले. (Ajit Doval conferred with the Tilak Award)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman