Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
२० सप्टेंबरनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

२० सप्टेंबरनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरातील बदलत्या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होण्याची शक्यता असून, २० ते २५ सप्टेंबरदरम्यान राज्यात पावसाच्या हालचाली वाढण्याचा अंदाज आहे.

२१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता असल्याने पावसाची प्रतीक्षा असलेल्या भागांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
हवामान अंदाजानुसार, १९ ते २२ सप्टेंबरदरम्यान पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. २१ सप्टेंबरला नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांतही मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. २२ सप्टेंबरला मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

पावसाचे पुनरागमन होण्याची चिन्हे असली तरी मराठवाड्यातील पाणीटंचाईचे संकट अद्याप गंभीर आहे. राज्यात सर्वाधिक पावसाची तूट असलेल्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात वडमुरांबी गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पुरेसा पाणीसाठा नसल्याने नागरिकांना रात्री उशिरापर्यंत पाण्याच्या शोधासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.
पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आल्याने आगामी उन्हाळ्याबाबतही ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडवून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरमध्येच ऑक्टोबरसारखी उष्णता जाणवत आहे. जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने एकीकडे कोरडे वातावरण, तर दुसरीकडे वाढते तापमान अशी स्थिती आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानात सुमारे ३.४ अंश सेल्सिअसची वाढ झाली असून, पावसाळ्यातच नागरिकांना उन्हाळ्याचा अनुभव घ्यावा लागत आहे.

कोकणात पालघर, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव तसेच नाशिकच्या घाटमाथ्यावर विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगरमध्येही तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून, सोलापूर तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर विजांसह पाऊस होऊ शकतो. विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यासाठी सध्या हवामान विभागाकडून विशेष इशारा देण्यात आलेला नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असली, तरी लातूरसह पावसाची तूट असलेल्या भागांतील पाणीटंचाईची स्थिती तातडीने दूर करण्यासाठी स्थानिक प्रशासनासमोर मोठे आव्हान कायम आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch