Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अप्पर वैतरणा तलाव कोरडा; मुंबईवर पाणीटंचाईचे संकट गडद

अप्पर वैतरणा तलाव कोरडा; मुंबईवर पाणीटंचाईचे संकट गडद

मुंबई प्रतिनिधीमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या जलस्रोतांपैकी एक असलेला अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे कोरडा पडला असून त्यातील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला आहे. त्यामुळे या तलावातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा प्रशासनाने बंद केला आहे.

गेल्या वर्षी याच काळात तलावात काही प्रमाणात पाणीसाठा शिल्लक होता, मात्र यंदाच्या तीव्र उन्हामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये मिळून केवळ 15.57 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध साठा पाहता पुढील 40 ते 45 दिवसांपुरतेच पाणी पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत समाधानकारक पाऊस न झाल्यास मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
या पार्श्वभूमीवर मुंबईची मुख्य भिस्त आता भातसा, मोडक सागर आणि मध्य वैतरणा या तलावांवर आहे. त्यापैकी भातसा तलावातून दररोज मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जात असून तोच सध्या मुंबईसाठी सर्वात महत्त्वाचा जलस्रोत ठरत आहे.
मात्र, मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यास उर्वरित जलसाठ्यावर ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट टाळण्यासाठी आता मुंबईकरांच्या नजरा मान्सूनच्या आगमनाकडे लागल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch