Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषण, समाजकल्याण आयुक्तालयाला 'टाळे ठोको' आंदोलन!

बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषण, समाजकल्याण आयुक्तालयाला 'टाळे ठोको' आंदोलन!

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) फेलोशिपधारक अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे गेल्या काही दिवसांपासून समाजकल्याण आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन सुरू आहे.

१९ ऑगस्टपासून धरणे आंदोलन, तर २४ ऑगस्टपासून आमरण उपोषणास बसलेल्या या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची आणि मागण्यांची प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाही. शासनाच्या जाचक अटींमुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जीवाची बाजी लावून उपोषणास बसलेल्या या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून घेण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते राहुल डंबाळे उद्यापासून स्वतः उपोषण आंदोलनाला बसणार आहेत.

प्रशासनाच्या आणि सरकारच्या ढिम्म कारभाराचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि हक्काची फेलोशिप मिळवण्यासाठी उद्या सर्व आंदोलक विद्यार्थी आणि कार्यकर्ते मिळून समाजकल्याण आयुक्तालयाला 'टाळे ठोको' आंदोलन करणार आहेत.
याबाबत बोलताना राहुल डंबाळे म्हणाले, "सामाजिक न्याय विभागाकडे अतिरिक्त निधी उपलब्ध असतानाही, हजारो कोटी रुपये इतर विभागांना बेकायदेशीरपणे वळविले जात आहेत. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना फेलोशिप नाकारणे हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. जोपर्यंत शासन २०२३ च्या जाचक आणि अन्यायकारक अटी रद्द करत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही."

संशोधक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि या स्वाभिमानाच्या लढ्यासाठी सर्व आंबेडकरी चळवळीतील संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch