पुणे - भारत देशाची जीवनदृष्टी ही उदार सहिष्णू आणि विज्ञानाधिष्ठित असल्याचे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवाराचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांनी केले. प्रख्यात लेखिका व संशोधक अमी गणात्रा लिखित 'व्हाय आर वी धिस वे: अ गाईड टू हिंदू शास्त्राज' या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच त्यांच्या हस्ते करण्यात आले.
हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात नेशन फर्स्ट आणि चाणक्य मंडल परिवार यांच्यातर्फे प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेशन फर्स्टचे संस्थापक सुनील भोसले, बोध या संस्थेचे संस्थापक आणि प्रसिद्ध लेखक पंकज सक्सेना, मेजर वंदना शर्मा, डॉ. सुधीर काळकर, डॉ. वासुदेव ऐतल व केदारनाथ चक्रदेव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हडपसरच्या विकासात बहुमोल हातभार लावणाऱ्या रघुनाथ तुपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सनातन म्हणजे भारतीय आणि भारतीय म्हणजेच हिंदू आहे. भारत हे राष्ट्र एक हजार वर्षाच्या संकटातून जागृत होऊन उत्थानाच्या वाटेवर आहे. आपल्या देशाची जीवनदृष्टी ही उदार, सहिष्णू आणि विज्ञानाधिष्ठित असल्याचे धर्माधिकारी यावेळी म्हणाले. भारताचा विचार हा शाश्वत आहे, अमी गणात्रा यांनी तो आपल्या पुस्तकामध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने मांडला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
भारत हा ब्रिटिशांनी उभा केलेला देश आहे असे अनेकदा म्हटलं जाते, पण त्यामध्ये काही तथ्य नाही. कारण भारताला रामायण, महाभारताची मोठी परंपरा लाभलेली आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वेदाला मोठे महत्व आहे. नागरीकरण जसे होत गेले तसे इथे देखील बदल झाले असल्याचे गणात्रा यावेळी म्हणाल्या. हिंदूं संस्कृतीमध्ये विवेकबुद्धीला कायमच महत्व राहिलेले आहे. हिंदू शास्त्रांमधून विवेक जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आपण अनेकदा तीर्थ यात्रेला जातो, त्यावेळी आपल्याला तिथे जाण्यामागचा आपला नेमका भाव जर समजला तर त्याचा आपल्याला निश्चितपणे चांगला फायदा होईल. नदीची पूजा करताना त्याचे पर्यावरणाच्या दृष्टीने असणारे पावित्र्य आपण समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे गणात्रा यावेळी आवर्जून नमूद केले. गणात्रा यांनी पुस्तकाची संकल्पना, विषयाची पार्श्वभूमी आणि लेखनामागील प्रेरणा याची माहिती देखील यावेळी दिली.
हिंदू धर्मातील शास्त्राकडे आपला भाव, दृष्टिकोन कसा पाहतो, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत लेखक पंकज सक्सेना यांनी यावेळी व्यक्त केले. आपल्याला विवेकबुद्धी जागृत ठेवण्यासाठी कायम ध्यान आणि चिंतन करण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले.
'संघटित रहेंगे सुरक्षित रहेंगे' हे नेशन फर्स्ट चे ब्रीद उद्घोषित करत अशा स्वरूपाचे हिंदू जनजागृती आणि समाज उत्कर्ष असणारे विविध उपक्रम आपण नेहमीच समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न असतो आणि यापुढेही असेल् असे नॅशन फर्स्टचे संस्थापक सुनील भोसले यांनी सांगितले.
तरुणांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संयुक्ता भोसले यांनी केले.

