Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोपाळ गायन समाजाला १०० वर्षांपूर्वीचा तानपुरा भेट

गोपाळ गायन समाजाला १०० वर्षांपूर्वीचा तानपुरा भेट

रांजपे कुटुंबियांचा पुढाकार ; कै. कमलाबाई परांजपे यांना बालगंधर्वानी दिलेला तानपुरा

पुणे : बालगंधर्व आणि परांजपे कुटुंबियांचा असलेला घरोबा… बालगंधर्वांनी परांजपे कुटुंबाला भेट दिलेला तानपुरा आणि गंधर्वांच्या शेवटच्या काळातील घटना अशा अनमोल आठवणींचा ठेवा प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी पुणेकरांसमोर उलगडला.

बालगंधर्वानी कै. बापूसाहेब व कमलाबाई परांजपे यांना दिलेला १०० वर्षांपूर्वीचा तानपुरा डॉ.रामचंद्र परांजपे यांना गोपाळ गायन समाज संस्थेला भेट दिला.

टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात गोपाळ गायन समाज संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीच्या निमित्ताने आयोजित उत्सवात ही भेट परांजपे कुटुंबियांनी दिली. यावेळी गोपाळ गायन समाजाचे डॉ.विकास कशाळकर, सुरेश साखोळकर, विजयकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

संगीत परंपरेचे जतन व संवर्धन करणारी गोपाळ गायन समाज संस्था हा ऐतिहासिक ठेवा असलेला तानपुरा जतन करणार आहे. डॉ.रामचंद्र परांजपे यांच्या मातोश्री कै. कमलाबाई परांजपे या गोपाळ गायन समाजात पं. गोविंदराव देसाई यांच्याकडे शिकत होत्या. प्रत्येक गोकुळाष्टमीला उत्सवात त्यांचे गायन होत असे. सन १९२१ मध्ये मुंबईमध्ये संयुक्त मानापमानचा प्रयोग होता. त्यावेळी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी आपला तानपुरा बालगंधर्वांना सप्रेम भेट दिला होता.

बालगंधर्व पुण्यात आले की कै. बापूसाहेब व कमलाबाई परांजपे यांच्याकडे उतरत असत. तसेच त्यांना नाट्यपदे शिकवत असत. त्यावेळी केशवरावांचा तानपुरा बालगंधर्वानी कै. बापूसाहेब व कमलाबाई परांजपे यांच्याकडे दिला होता. त्यांचे सुपुत्र डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी तो जतन केला आहे. हाच ऐतिहासिक ठेवा गोपाळ गायन समाजाला भेट म्हणून देण्यात आला. शंभराहून अधिक वर्षे उलटून गेली तरी देखील आजही तो तानपुरा देखणा व उत्तम स्थितीत आहे.

गोपाळ गायन समाजच्या शतकोत्तर उत्सवाचा प्रारंभ कै. कमलाबाई परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित 'रंगबहार' या नाटयगीतांच्या कार्यक्रमाने झाला. यावेळी सूरगंधर्व सुरेश साखवळकर, बकुळ पंडित, केदार केळकर, अस्मिता चिंचाळकर, अभिनेत्री गात, रवींद्र कुलकर्णी व संजय गोगटे (ऑर्गन), केदार कुलकर्णी (तबला) यांनी सादरीकरण केले. निरंजन कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch