Saturday, 25 Sep, 12.02 am महाराष्ट्र लोकमंच

लेटेस्ट न्यूज
'किडनी केअर' ॲपचे लोकार्पण; कोडेक्वे टेक्नॉलॉजीजद्वारे निर्मिती

पुणे : किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या "किडनी केअर" या ॲपची कोडेक्वे टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडने निर्मिती केली आहे. आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कायनेटिक कम्युनिकेशन्सचे संचालक डॉ. दीपक शिकारपूर, प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉ. शैलेश काकडे, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत कलशा, संस्थापक- संचालक सुनील माने आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. काकडे म्हणाले की, हे ॲप रुग्णांना डॉक्टरांपर्यंत सहज पोहचवण्यास मदत करेल. डॉक्टरांकडून रुग्णांना त्वरित उपचार देण्यास मदत होईल. डॉक्टर आणि रुग्ण दोघांच्या कामाचा ताण कमी होईल. वेळ वाचेल. परिणामी, प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांवर तात्काळ उपाययोजना राबविणे शक्य होईल. गंभीर रुग्णांना जीवदान मिळेल. कोडेक्वे टेक्नॉलॉजीजचे हे ॲप म्हणजे डिजिटल परिवर्तनाचा विधायक व लोकप्रिय उपक्रम ठरेल, यात शंका नाही.

डॉ. शिकारपूर म्हणाले," डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट हेल्थकेअर हा निरोगी स्वास्थाचा नवीन मंत्र विकसित होत आहे. कोडेक्वे कंपनीने तयार केलेले "किडनी केअर" हे ॲप म्हणजे त्यातीलच एक महत्वाकांक्षी पाऊल म्हणता येईल.

कलशा म्हणाले, भारतात प्रत्येक वर्षी ९० हजार रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. एकट्या महाराष्ट्राला १० हजार प्रत्यारोपणाची गरज भासते. किडनी प्रत्यारोपण झाल्यावरही असे अनेक घटक असतात जे मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या रुग्णांवर दीर्घकालीन व गंभीर परिणाम करू शकतात. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन आरोग्यावर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे असते. हे लक्षात घेऊन, आम्ही 'किडनी केअर ' हे अभिनव स्मार्टफोन अॅप्लिकेशन तयार केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे.

ते किडनी प्रत्यारोपण झालेला रुग्ण व आरोग्य तज्ञ यांच्यातील दुवा म्हणून हे ॲप काम करेल. या ॲपच्या माध्यमातून रुग्णांना त्यांच्या स्वास्थासंदर्भातील कोणत्याही लहान-मोठ्या तक्रारीवर आरोग्य तज्ञांची त्वरित व थेट संवाद साधता येईल. यामुळे रुग्णांच्या आरोग्यविषयी अल्प अवधीत त्यांच्याशी सल्ला मसलत करणे, आवश्यक ते उपचार सुचविणे तज्ज्ञांना शक्य होईल. यामुळे उपचारासाठी लागणारा वेळ कमी होईलच पण रुग्णांच्या बाबतीत कोणतीही वैद्यकीय आणीबाणी उद्भवल्यास त्यांना त्वरित उपचार देता येतील, असेही कलशा यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch
Top