लातूर : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग आला असून, सीबीआयचे पथक आज लातूर पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. यावेळी सीबीआय अधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
तपासाच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात असून, पुढील कारवाईबाबत रणनीती आखण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात आतापर्यंत लातूरमधील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच चार डॉक्टरांची चौकशी सुरू असून, पेपरफुटी रॅकेटचे धागेदोरे शोधण्यासाठी तपास यंत्रणा विविध स्तरांवर माहिती गोळा करत आहे. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन सीबीआय आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींवर कारवाई करू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, पुण्यातही सीबीआयने मोठी कारवाई करत विविध भागांत छापेमारी केली. मनीषा हवालदार हिच्या अटकेनंतर सदाशिव पेठ, कात्रज, शिवाजीनगर आणि बुधवार पेठ परिसरात छापे टाकण्यात आले. तपास यंत्रणेला या भागांतून पेपर विक्री किंवा व्यवहार झाल्याचा संशय असून, संबंधित पुरावे आणि संपर्क साखळीचा शोध घेतला जात आहे.
देशभर गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, तपास यंत्रणांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

