Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता धोका; ऑगस्टमध्ये ३१ रुग्णांची नोंद

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता धोका; ऑगस्टमध्ये ३१ रुग्णांची नोंद

पिंपरी-चिंचवड, दि. ३ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत झालेली वाढ चिंतेचा विषय ठरली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात तब्बल ३१ रुग्ण आढळले आहेत.

मात्र, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

यंदा जानेवारीमध्ये स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर जुलैमध्ये पाच आणि ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत अचानक वाढ होत ३१ रुग्णांची नोंद झाली. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास २०२२ मध्ये शहरात ५८ रुग्ण आढळले होते. त्यापैकी ३४ रुग्ण ऑगस्ट महिन्यात होते. तर २०२४ मध्ये १५ रुग्णांची नोंद झाली होती.

गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, प्रवास करताना मास्कचा वापर करावा आणि वारंवार हात स्वच्छ धुवावेत, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
स्वाईन फ्लू हा H1N1 प्रकारातील इन्फ्लूएंझा संसर्ग असून संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे त्याचा प्रसार होऊ शकतो. संक्रमित वस्तूंना स्पर्श केल्यानंतर नाक, तोंड किंवा डोळ्यांना हात लावल्यानेही संसर्ग होण्याची शक्यता असते.

ताप, सर्दी, घसा खवखवणे, सतत खोकला, नाक वाहणे, डोकेदुखी, डोळ्यातून पाणी येणे आणि प्रचंड थकवा ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. काही गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होऊन न्यूमोनियाही होऊ शकतो.
ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंड, यकृत किंवा श्वसनविकार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. H1N1 ची लक्षणे असलेल्या व्यक्तीने इतरांपासून अंतर ठेवून स्वतःला विलगीकरणात ठेवावे, असेही महापालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch