Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
यशाचे श्रेय सरकारला, अपयशाचा ठपका कनिष्ठ अधिकाऱ्यांवर : अण्णा हजारे

यशाचे श्रेय सरकारला, अपयशाचा ठपका कनिष्ठ अधिकाऱ्यांवर : अण्णा हजारे

हिल्यानगर : सरकार यशाचे श्रेय स्वतः घेते; मात्र अपयश आले की त्याची जबाबदारी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर ढकलली जाते, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारवर केली. नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत हजारे यांनी येथील वाडिया पार्कमधील गांधी स्मारक येथे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत मौन आंदोलन केले.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नवी दिल्ली येथे झालेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली.

लोकशाही व्यवस्थेत हिंसाचार, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस आणि अनावश्यक बळाचा वापर यांना स्थान नसावे, असे हजारे यांनी म्हटले. पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब आणि बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांमुळे देशातील लाखो तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. या असंतोषाकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता तरुणांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या तक्रारी २०२४ मध्येही आल्या होत्या आणि यंदाही त्याची पुनरावृत्ती झाली. या प्रकरणात २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा हजारे यांनी केला. परीक्षा पुन्हा घेण्यात आली असली तरी निकालातही अनियमिततेचे आरोप झाल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांचे आंदोलन गेल्या २५ दिवसांपासून सुरू असून संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. जबाबदारी निश्चित करून मंत्र्यांनी राजीनामा दिल्यास सरकार कोसळणार नाही. मात्र, अशा कारवाईमुळे इतर मंत्र्यांनाही आपल्या जबाबदारीत कसूर केल्यास पद गमवावे लागू शकते, असा स्पष्ट संदेश जाईल, असे हजारे यांनी म्हटले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Lokmanch