Thursday, 03 Oct, 11.17 am महाराष्ट्र न्यूज

होम
मयांक अग्रवालचा धमाका; कसोटीमध्ये ठोकलं पहिले द्विशतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत कसोटी कारर्किदीतील पहिले द्विशतक झळकावले आहे. मयांकच्या या खेळीचे कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या तुफान फटकेबाजीचे त्यांच्या सहकाऱ्यांसह क्रिकेटप्रेमी चाहत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. सोशल मीडियातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या खेळामुळे भारताने ४०० धावांचा टप्पा पार केला.

मयाकनं २०१८-१९ मध्ये बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेपासून कसोटीत पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग अर्धशतकं ठोकून त्यानं आपलं स्थान पक्कं केलं. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतही मयांकनं ५० हून अधिक धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, अर्धशतकाचं शतकामध्ये रूपांतर करण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल जाणकारांकडून शंका व्यक्त केली जात होती. या सर्व शंकांना मयांकनं आज आपल्या खेळीतून चोख उत्तर दिलं. कसोटी शतक झळकावणारा तो ८६ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याचं हे शतक भारताचं ५१० वं कसोटी शतक ठरलं आहे.

मयांकबरोबर रोहित शर्माला कसोटीतील सलामीवर म्हणून प्रथमच संधी देण्यात आली होती. त्यानं पहिल्याच सामन्यात २४४ चेंडूंत १७६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा मानही रोहित आणि मयांकला मिळाला आहे. या दोघांनी मिळून ३१७ धावांचा डोंगर रचला. यापूर्वी सर्वाधिक भागीदारीचा विक्रम गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर होता. त्यांनी पहिल्या विकेटसाठी २१८ धावा केल्या होत्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra News
Top